वृक्ष लागवडीची उद्दिष्टपूर्ती करावी ः जिल्हाधिकारी
वृक्ष लागवड आढावा बैठक ; जिल्ह्याला 8.52 लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट
बुलडाणा, दि. 05 - पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड करणे अत्यावश्यक असून राज्य शासनाने त्यासाठी वृक्ष लागवड मोहिमच राबविली आहे. जिल्ह्याला 8.52 लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट सन 2016-17 साठी मिळाले आहे. या उद्दिष्टपूर्तीकरीता समाविष्ट असलेल्या यंत्रणांना समन्वयाने कार्य करावयाचे आहे. वन विभाग व सामाजिक वनीकरण विभाग यांनी सर्व यंत्रणांशी समन्वय ठेवून उद्दिष्टपूर्तीसाठी कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या.वृक्ष लागवड उद्दिष्टपूर्तीकरीता आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी आढावा घेताना जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, उपवसंरक्षक बी.टी भगत, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे आदी उपस्थित होते.
वृक्ष लागवड करण्याच्या जागेची निश्चिती करून त्याचे अक्षांश-रेखांश त्वरित देण्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले, प्रत्येक यंत्रणेने आपणाकडील जागांची निश्चिती करून अक्षांश-रेखांश द्यावेत. तसेच खड्डे खोदण्याचे कार्य सुरू करावे. जेणेकरून पावसाळ्यापूर्वी खड्डे खोदाई पूर्ण होवून रोपांची लागवड करता येईल. मागील वर्षामध्ये लागवड केलेल्या जीवंत रोपांची संख्या कळवावी. जीवंत रोपांची संख्या जास्तीत जास्त ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. उद्दष्टिपूर्ती करण्यासाठी वन व सामाजिक वनीकरण विभाग यांनी उद्दिष्टपूर्तीमध्ये कमी पडत असलेल्या यंत्रणांना सहाय्य करून वृक्ष लागवड मोहिम प्रभावी राबविण्यासाठी प्रयत्न करावे.
बैठकीत उपवनसंरक्षक बी.टी भगत यांनी माहिती दिली. यावेळी वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी, संबंधीत यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
