Breaking News

गुंफण अकादमीच्या गुंफण गौरव पुरस्काराचे 21 रोजी वितरण

सातारा, दि. 5 (प्रतिनिधी) : साहित्य, सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे अग्रगण्य व्यासपीठ मानल्या जाणार्‍या गुंफण अकादमीचे सन 2017 साठीचे गुंफण पुरस्कार अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्‍वर चेणगे यांनी जाहीर केले आहेत. 21 मे रोजी मसूर (ता. कराड, जि. सातारा) येथे होणार्‍या 14 व्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यंदाच्या गुंफण साहित्य पुरस्कारासाठी आंबेडकरी चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते व रिपब्लिकन पक्षाचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष किशोरभाऊ तपासे यांची ’ख्योळ’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकासाठी निवड करण्यात आली आहे. 25 वर्षे बंद पडलेली सातार्‍यातील आंबेडकर जयंती मिरवणूक त्यांनी पुन्हा सुरू केली. दलित पँथरच्या माध्यमातून नामांतराच्या लढ्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. बिबवेवाडी (पुणे) येथील ज्ञानसागर शिक्षण संस्थेचे सचिव व सामाजिक कार्यकर्ते प्रताप देशमुख यांना गुंफण सामाजिक पुरस्कार जाहीर झाला आहे. ग्रामीण तरूणांना रोजगाराभिमुख कौशल्य वाढीसाठी मार्गदर्शन, शैक्षणिक साहित्याचे वाटप, माजी विद्यार्थ्यांचे संघटन आदी विविध माध्यमातून लोकोपयोगी कामातील योगदानाबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
पाटण तालुक्यातील पत्रकार संदीप डाकवे यांनी चित्रकला, व्यंगचित्रकला यासारखे छंद जोपासून त्यातून समाजमन घडवण्यात योगदान दिल्याबद्दल त्यांची गुंफण सांस्कृतिक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. विधायक पत्रकारिता करून त्यांनी शासनाचे विविध पुरस्कार मिळवले आहेत. नान्नज (ता. जामखेड, जि. नगर) येथील कवी व वक्तेभालचंद्र कोळपकर यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजात सद्भाव वाढीस लागावा यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांची गुंफण सद्भावना पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
वैद्यकीय व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक सेवेचा वसा चालवणारे व निरामय आरोग्यासाठी समाजप्रबोधनाला महत्व देणारे सातारा येथील प्रसिध्द धन्वंतरी डॉ. प्रतापराव गोळे यांना गुंफण वैद्यकीय पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक बांधिलकीची सतत जाणीव ठेवून ते समाजातील विविध घटकांसाठी आरोग्य शिबिरे आयोजित करत असतात. प्रसार माध्यम संपादक पत्रकार परिषदेचे अध्यक्ष व कराड तालुका मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष गोरख तावरे यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात बजावलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना गुंफण पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.