Breaking News

शताब्दी वर्षात कौशल्य विकासाच्या कार्यक्रमाला प्राधान्य : खा. पवार

सातारा, दि. 10 (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 58 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळी अनेक मान्यवरांनी त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. संस्थेच्या वतीने यंदापासून सुरू केलेला ’पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार’ याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांना प्रदान करण्यात आला. रयतच्या शताब्दी वर्षाचा शुभारंभ ऑक्टोबर 2018 मध्ये होत असून शताब्दी वर्षात कौशल्य विकासाच्या कार्यक्रमाला प्राधान्य देण्यात येणार आहे, असे सूतोवाच खासदार शरद पवार यांनी केले.
कर्मवीरांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्रातील अवघा रयत परिवार त्यांच्या समाधीवर नतमस्तक होण्यासाठी आज सातार्‍यात लोटला होता. कार्यक्रमास शरद पवार, अणूशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, पालकमंत्री विजय शिवतारे, प्रा. डॉ. एन. डी. पाटील, आमदार डॉ. पतंगराव कदम, दिलीप वळसे-पाटील, भाई गणपतराव देशमुख, रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर, शंकरराव कोल्हे, दादाभाऊ कळमकर, संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. अनिल काकोडकर यांना ’पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार’ याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
अभिवादनानंतरच्या कार्यक्रमात शरद पवार कोणता संदेश देतात हा तमाम रयत सेवकांच्या औत्सुक्याचा विषय असतो. यावेळी पवार म्हणाले, 4 ऑक्टोबर 2018 रोजी संस्थेच्या शताब्दी वर्षाचा शुभारंभ करण्यात येणार असून त्यानिमित्त वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये संस्थेतील प्रत्येक घटक सहभागी होईल अशी अपेक्षा आपण व्यक्त करत आहोत. केंद्र सरकारने कौशल्य विकासाला प्राधान्य देण्याचे धोरण ठेवले आहे. त्यानुसार नव्या पिढीच्या कौशल्य विकासाला संस्था महत्व देणार आहे. सेल्चरमार्फत सर्वत्र कौशल्य विकासाचा कार्यक्रम उपलब्ध करून देण्यात येईल. शिक्षणाचे स्वरूप बदलले आहे, गरजा बदलल्या आहेत. अशावेळी प्रचलित शिक्षण सुरू ठेवूया, पण त्याचवेळी आव्हाने पेलण्याची ताकद नव्या पिढीत येण्याच्या दृष्टीने बदलांना सामोरे जाण्याची तयारी ठेवुया.
अ, ब, क अशा व्यक्तींना संस्थेचे सभासद करून घेण्याविषयी विनंत्या येतात. या अपेक्षा ठेवण्यात गैरवाजवी असे काही नाही. पण याव्यतिरिक्त जे लोक संस्थेचे सभासद होऊ शकतात अशा व्यक्तींच्या नावाची यादी तयार करण्याची विनंती आपण संस्थेला करणार आहोत, असे सांगून, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर, जैन इरिगेशनचे अनिल जैन, बीव्हीजीचे हणमंतराव गायकवाड अशा लोकांनी संस्थेचे सभासद व्हावे म्हणून आपण त्यांना विनंती करणार आहोत. त्यांच्या ज्ञान व अनुभवाचा फायदा संस्थेला झाला पाहिजे, त्यातून संस्थेची गुणवत्तेची उंची वाढली पाहिजे, अशी भूमिका पवार यांनी यावेळी मांडली.
कर्मवीरांच्या नावाचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल डॉ. काकोडकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कर्मवीरांनी समाजाला व पर्यायाने देशाला पुढे नेण्यात शिक्षणाचे महत्व 100 वर्षांपूर्वी ओळखले होते. जीवनाचे मिशन म्हणून त्यांनी ते काम केले. आज रयत आशियातील सर्वात मोठी संस्था म्हणून ओळखली जाते, अशा शब्दात त्यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव केला. आजच्या ज्ञानयुगात शिक्षणाचे महत्व पूर्वी कधी नव्हते इतके वाढले आहे. नवीन तंत्रज्ञान पुढे येण्याचा वेग दिवसेंदिवस वाढतो आहे. अशा वेळी शिक्षण व कौशल्य विकास, शिक्षण व सामाजिक विकास, शिक्षण, संशोधन यांची आपण सांगड घालू शकलो, तर बरेच साध्य झाल्यासारखे होईल, असे विचार त्यांनी व्यक्त केले.
पद्मविभूषण किताबाबद्दल खासदार शरद पवार यांचा याप्रसंगी प्रा. डॉ. एन. डी. पाटील, माजी मंत्री, आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या हस्तेे संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात रयत विज्ञान पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी, देणगीदार, गुणवंत शिक्षक व शाखा यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी संस्थेचे सचिव प्रा. गणेश ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी संस्थेच्या वाटचालीचा सविस्तरपणे आढावा घेतला. डॉ. दीनानाथ पाटील यांनी आभार मानले.