Breaking News

अकोलेत शनिवारी धरणे आंदोलन

अकोले, दि. 05 - अकोले तालुक्यातील वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराबाबत व तालुक्यातील वीजेच्या प्रलंबित प्रश्‍नांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने व तालुक्यातील सर्व शेतकरी व नागरिकांच्या वतीने शनिवार (दि. 6 मे) सकाळी 11.00 वा बसस्थानकासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सेक्रेटरी यशवंतराव आभाळे यांनी दिली.
वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतकरी, विद्यार्थी, गृहिणी व नागरिक यांना सततच्या अनियमित भारनियमनामुळे रोजच वीजेच्या प्रश्‍नांना सामोरे जावे लागत आहे. सध्याच्या तीव्र उन्हाळयामुळे शेतातील पिके पाणी असुनही महावितरणच्या अनियमित भारनियमनामुळे हातातून जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
शेजारच्या संगमनेर तालुक्यात शेतीपंप धारकांना 11 तास शेतीपंपासाठी विद्युत पुरवठा अखंडित पणे सुरु आहे. पंरतु अकोले तालुक्यातील शेतकर्‍यांना 8 तासही अखंडितपणे वीज पुरवठा होत नाही. महावितरण कंपनी आपल्या मनमानी पध्दतीने पाहीजे तेव्हा कुठलीही पूर्व सुचना न देता भारनियमन करीत आहे. या सततच्या भारनियमनामुळे शेतकर्‍यांचा संताप अनावर झालेला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी विजेच्या प्रश्‍नावर आक्रमक झाले आहेत. या  आशायाचे निवेदन तहसीलदार अकोले, उपअभियंता वीज वितरण कंपणी अकोले व पोलीस निरीक्षक अकोले यांना दिले आहे. या निवेदनामध्ये मंजुर असलेले कुंभेफळ येथील 33 केव्हीए. सबस्टेशनचे काम त्वरीत पूर्ण करावे, शेतकर्‍यांचे संपूर्ण वीज बिल माफ करावे, तालुक्यातील वंचित असलेल्या वाडयावस्तीवरील विज कनेक्शनची कामे त्वरीत पूर्ण करावे, मवेशी व पाडाळणे येथील 33 के.व्ही.ए सबस्टेशनला काम त्वरीत सुरु करावे, निळवंडे धरणाच्या अवर्तन काळात शेती पंपाना पूर्ण वेळ वीज पुरवठा देण्यात यावा, भोजदरी येथील 132 केव्हीए सबस्टेशनमधून आंबड, इंदोरी, शेलविहीरे या फिडरला वीज पुरवठा दयावा या व आदी मागण्यांसाठी धरणे आंदोलनास तालुक्यातील सर्व शेतकर्‍यांनी व नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन यशवंतराव आभाळे केले आहे.