मंडलाधिकारी, तलाठ्याच्या संगणमताने जमीनीची विक्री
अकोले, दि. 05 - मंडलाधिकारी व तलाठी यांना हाताशी धरून खरेदीखताने विक्री केलेल्या जमिनीच्या 7/12 उतार्यावर फेरबदल करून दुबार विक्री करणार्या आई व मुलाविरूद्ध नारायणगाव पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सुजातअली इनामदार यांनी दिली.याप्रकरणी अनिल शंकर कुर्हाडे, पुपलता शंकर कुर्हाडे (दोघे रा. आळे) तसेच मंडलाधिकारी दादाभाऊ काळे, तलाठी आर. सी. वामन यांच्या विरोधात नारायणगाव पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 420, 467, 468, 34 प्रमाणे संगनमत करून फसवणूक केल्याचा गुन्हा दि. 3 मे रोजी दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी राजेंद्र शंकर हांडे (रा. आळेफाटा, ता.जुन्नर, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजेंद्र हांडे यांनी दि. 1 नोव्हेंबर 1988 रोजी आळे येथील पुपलता शंकर कुर्हाडे यांचेकडून जमीन गट नं.2586 एकुण क्षेत्र 115 आर रजिस्टर खरेदीखताने विकत घेतली होती. परंतु पुपलता कुर्हाडे यांचा मुलगा अनिल कुर्हाडे याने सन 2006 साली जुन्नर कोर्टात हांडे यांचेविरूद्ध दावा दाखल केला होता. त्याचा निकाल हांडे यांचे बाजूने देण्यात आला होता.
त्यानंतर सन 2014 साली अनिल कुर्हाडे यांनी तहसीलदार जुन्नर, सन 2015 मध्ये प्रांताधिकारी जुन्नर विभाग मंचर, तसेच सन 2016 साली अप्पर जिल्हाधिकारी पुणे यांचेकडे दावे दाखल केले. मात्र या सर्व दाव्यांचे निकाल हांडे यांच्या बाजूने लागले. या सर्व निकालांची फेरफार नोंद महसुल मंडलाधिकारी दादाभाऊ काळे यांनी दि. 27 जानेवारी 2017 रोजी मंजुर करून हांडे यांचे नावाचा 7/12 उतारा दिला होता.
असे असताना देखील अनिल कुर्हाडे यांनी तलाठी वामन व मंडलाधिकारी काळे यांचेशी संगनमत करून दि. 12 जानेवारी 2017 रोजी बनावट 7/12 उतारा तयार करून त्याआधारे सदरहू जमीन गट नं. 2586 एकुण क्षेत्र 115 आर पैकी 76.66 आर क्षेत्र सुषमा समीर गावडे (रा. येडगाव) यांना दि.13 जानेवारी 2017 रोजी नारायणगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात रजिस्टर खरेदीखताने रक्कम 15 लाख रूपयांस विक्री केली. तद्नंतर हांडे यांनी ऑनलाईन उतारा काढला असता 7/12 उतार्यावर प्रलंबित फेरफार 14498 असे लिहले असल्याचे दिसले. हांडे यांना उतार्याविषयी शंका निर्माण झाल्याने चौकशी केली. तर ही फसवणूकीची बाब उघडकीस आली. त्यामुळे हांडे यांनी अनिल शंकर कुर्हाडे, पुपलता शंकर कुर्हाडे, मंडलाधिकारी दादाभाऊ काळे, तलाठी आर.सी. वामन यांच्या विरोधात संगनमत करून फसवणूक जमिनीचा बनावट 7/12 उतारा तयार करून दुबार विक्री केल्याप्रकरणी नारायणगाव पोलीसांत फिर्याद दिली आहे. पुढील तपास नारायणगावचे सहाय्यक पोनि. टी. वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुजातअली इनामदार हे करीत आहेत.