Breaking News

पत्नीचा खून केल्याप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा

सातारा, दि. 4 (प्रतिनिधी) : पत्नीला कॅनॉलमध्ये ढकलून देऊन खून केल्याप्रकरणी सुरेश ऊर्फ सूर्यकांत मारुती गोरे (वय 35, रा. तांदूळवाडी, ता. कोरेगाव) याला जन्मठेप व 1 हजार रुपये दंड, तो न दिल्यास 1 महिना सक्तमजुरी अशी शिक्षा दुसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एम. मोहिते यांनी ठोठावली.
सौ. संध्या सुरेश गोरे (वय 38, रा. तांदूळवाडी, मूळ रा. मनाली अपार्टमेंट, शुक्रवार पेठ, सातारा) या विवाहितेचा खून झाला होता.  याप्रकरणी विवाहितेचे वडील कुमार अनंतराव सूर्यवंशी (वय 65, रा. मनाली अपार्टमेंट, शुक्रवार पेठ) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. दि. 20 मे 2016 रोजी सौ. संध्या माहेरी सातारा येथे होती. सकाळी सुरेश हा सातार्‍यातील घरात येवून तो संध्याला तांदूळवाडी येथे घेवून जातो, असे सासरे कुमार सुर्यवंशी यांना सांगून संध्याला घेवून गेला. दरम्यान, सकाळी गेल्यानंतर सुरेश पुन्हा दुपारी सातार्‍यातील घरी आला. त्यानंतर पत्नी संध्या बेपत्ता झाली असल्याचे सासरे कुमार सुर्यवंशी यांना सांगून पोलिसांमध्ये तक्रार देण्याची विनंती केली. दुसर्‍या दिवशी चिंचणेर निंब, ता. सातारा येथे कॅनॉलमध्ये महिलेचा मृतदेह सापडला. खातरजमा केल्यानंतर तो मृतदेह संध्या हिचाच असल्याचे स्पष्ट झाले.
यावेळी तिचे वडील कुमार सुर्यवंशी यांनी सुरेश गोरे याच्याविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात खुनाची तक्रार दिली होती. महिला फौजदार स्मिता नवघरे यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून न्यायाधिशांनी आरोपीला शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. मिलींद ओक यांनी काम पाहिले.