Breaking News

दिवसभर मोबाईलमध्ये व्यस्त असलेली तरुण पिढी धार्मिकता, सामाजिकता यापासून काहीशी दूर

अहमदनगर, दि. 05 - जग आधुनिकतेकडे चालले आहे. त्याचबरोबर तरुण पिढीही मोबाईलकडे वळाला आहे. मोबाईलचा योग्य वापर करण्याऐवजी त्याचा दुरुपयोग होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. दिवसभर मोबाईलमध्ये व्यस्त असलेली तरुण पिढी धार्मिकता, सामाजिकता यापासून काहीशी दूर जाऊ लागली आहे. त्यांना यापासून परावृत्त करण्याची जबाबदारी आता प्रत्येकाने घ्यायला हवी. काही प्रतिबंध या तरुणांवर लादल्यास पुढील दुष्परिणाम टाळता येऊ शकतील, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
आमदार संग्राम जगताप यांच्या निधीतून प्रभाग 4मधील आदर्शनगर येथील श्रीराम मंदिराच्या सभामंडपाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आ. जगताप बोलत होते. याप्रसंगी माजी नगरसेवक पोपट बारस्कर, दत्ता पा. सप्रे, सुखदेव मते, डॉ. जगन्नाथ ठोंबरे, दिलीप म्हसळकर, सोपान देसाई, इंगवले सर, ज्ञानदेव वाघ, संजय ठोंबरे, कांचन इंगवले, शीला कांडेकर, शोभा मते, काळेमहाराज आदी उपस्थित होते.
आ. जगताप पुढे म्हणाले की, सध्याच्या पिढीला धार्मिक विचारांकडे वळविण्याची गरज आहे. या सभामंडपाद्वारे सांप्रदायिकता वाढण्यास मदत होईल. या ठिकाणी या परिसरातील विविध धार्मिक कार्यक्रम होऊ शकतील. त्याचा समाज घडविण्यासाठी चांगला उपयोग होऊ शकेल. जो समाजाचा सेवक म्हणून काम करतो, तो खर्‍या अर्थाने नगरसेवकच असतो. नागरिकांमध्ये जर एकोपा नसेल, तर विकास करायला मर्यादा पडतात, असे ते म्हणाले.
माजी नगरसेवक पोपट बारस्कर म्हणाले की, या भागाचा विकास आमदार जगताप यांनीच केला आहे. क्लासिक हॉटेल ते गांधीनगर परिसरातील अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याचे काम मार्गी लागल्यामुळे या परिसरातील दळणवळणाचा प्रश्‍न सुटला. श्रीराम मंदिराला सभामंडप उभारल्याने त्याचा फायदा सर्वांनाच होणार आहे, असे ते म्हणाले.