Breaking News

फिरण्यासाठी मुंबईत आलेल्या तरुणीचा सेल्फी काढताना पाण्यात बुडून मृत्यू

मुंबई, दि. 04 - र्यातील बॅण्डस्टॅण्ड येथे सेल्फी काढताना तोल गेल्यामुळे एका 21 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटनी घडली आहे. मिनाक्षी प्रिया राजेश असे या मुलीचे नाव असून ती तामिळनाडूमधील रहिवासी होती. परिक्षा संपल्यानंतर फिरण्यासाठी ती आपल्या कुटुंबाबरोबर मुंबईत आली होती. सोमवारी ती कुटुंबाबरोबर बॅण्डस्टॅण्ड येथे गेली असता आई आणि बहिणीबरोबर सेल्फी काढण्याचा हट्ट धरला. तिच्या वडिलांनी यासाठी नकार दिला होता. मात्र तरीही ती सेल्फी काढण्यासाठी पुढे गेली. यावेळी भरतीची लाट आल्यामुळे ती पाण्यात वाहून गेली. बराच वेळ ती मदतीसाठी हाका मारत होती. मात्र कोणीही तिची मदत करू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी पोलिसांना बोलावले. घटनास्थळी अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका बोलावण्यात आली होती. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी सायंकाळी मच्छिमारांना मिनाक्षी हिचा मृतदेह आढळून आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.