Breaking News

काँग्रेसच्या सोशल मिडीयाची खाती सांभाळण्याची जबाबदारी कन्नड अभिनेत्री राम्याकडे

नवी दिल्ली, दि. 11 - उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील निवडणूकीत काँग्रेसला आलेल्या अपयशानंतर काँग्रेसकडून अनेक बदल करण्यात येत आहेत. असेच  काही बदल सोशल मिडीयावर करण्यात आले आहेत. कर्नाटकच्या माजी खासदार आणि कन्नड अभिनेत्री राम्या यांची काँग्रसच्या सोशल मिडीया समूहाच्या प्रमुखपदी  नियुक्ती करण्यात आली आहे. 
राम्या यांची नियुक्ती दीपेंदर सिंग हुड्डा यांच्या जागी करण्यात आली आहे. दीपेंदर सिंग हुड्डा यांची नियुक्ती अन्य महत्वाच्या पदावर करण्यात येणार असल्याची चर्चा  सुरू आहे. राम्या यांनी आपला कार्यभार सांभाळला असल्याचे सांगण्यात येत आहे. याअंतर्गत काँग्रेसची संकेतस्थळे, ट्विटर, फेसबुक यांसारखी खाती सांभाळली  जाणार आहेत. आज काल सोशल मिडीयाचा जास्त वापर होत असल्यामुळे काँग्रेसनेही सोशल मिडीयावर सक्रिय राहण्यासाठी हा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.