Breaking News

सनफार्मा कंपनी विरोधात कामगारांचा एल्गार

अहमदनगर, दि. 22 -  एमआयडीसी येथील सनफार्मा कंपनीतील कामगारांनी मॅनजमेंटच्या मनमानी कारभाराच्या विरोधात एल्गार पुकारला असून, कामगारांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सोमवार दि.22 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. कामगारांवर होणार्या अन्यायाची सीबीआय चौकशी करण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती शिरीष जाधव यांनी दिली.
मॅनेजमेंटच्या मनमानी कारभारामुळे कुठलीही पुर्व सुचना न देता कामगारांना कामावरुन काढून टाकणे. काम करताना कामगारांना कोणतीही सुरक्षा न देणे. मध्यंतरी स्फोट झाल्याने चार कामगारांचा मृत्यू झाला. या अपघात समयी ज्या कामगारांनी मदतीची भुमिका बजावली त्यांना कामावरुन काढून टाकण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. तसेच ज्या कामगारांनी हक्कासाठी आवाज उठवला त्याला कंपनी प्रशासनाने पुर्वसुचना न देता कामावरुन काढल्याचे आंदोलकांचे म्हणने आहे. अपघाती मृत्यू झालेल्या कामगारांनी नुकसान भरपाई किती मिळाली व अपघाताचा पुरावा नष्ट करण्यासाठी कामगारांचा मृतदेह कंपनीच्या सरंक्षक भिंती बाहेर टाकलेल्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर आंदोलन लोकशाही पध्दतीने केले जाणार असून, आंदोलन दडपण्यासाठी कंपनी प्रशासन पोलिसांच्या माध्यमातून दबाव आनत आहे. कामगारांना न्याय मिळेपर्यंन्त आंदोलन चालू राहणार असून, इतर कामगारांनी देखील या आंदोलनास पाठिंबा देण्याचे आवाहन राजकुमार भोसले यांनी केले आहे.