Breaking News

पिंपरी येथील गॅस्ट्रोच्या रुग्णांच्या संख्येत वाढ

कोरेगाव, दि. 4 (प्रतिनिधी) : कोरेगाव तालुक्यातील पिंपरी येथील 400 नागरिकांना गॅस्ट्रो सदृश्य आजाराचा संसर्ग झाला असून साथ नियंत्रित करण्यासाठी आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. सध्या साथ आटोक्यात आणण्यात आरोग्य विभागाला काही प्रमाणात यश आले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी पिंपरी येथे 7 दिवस वैद्यकीय पथक नेमण्याचे आदेश दिले आहे. 
यात्रा कालावधीत गावच्या पाणीपुरवठा योजनेवर जलसुरक्षा रक्षक म्हणून काम करणारा कर्मचारी अमर मधुकर फडतरे याने सलग तीन दिवस विहिरीसह पाणीपुरवठा वितरीत होणार्‍या टाकीत जलशुध्दीकरण करणारे टीसीएल टाकले नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याच पाण्याचा पुरवठा झाल्याने नागरिकांना उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागला. याच दरम्यान आणखी काही जणांना लागण झाल्याने त्यांना रहिमतपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गॅस्ट्रो सदृष्य आजाराचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येमध्ये अचानक वाढ झाल्याने झाल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पवार यांनी कर्मचार्‍यांसह बाधित रुग्णांची तपासणी केली. यामधील काही रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक मिसाळ यांनी जिल्हा कार्यालयांतील अत्यावश्यक औषधांचा साठा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव यांनी रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे पाहून रहिमतपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. संजय कुंभार व अतिरिक्त कर्मचार्‍यांना बोलावून घेतले. रूग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याने पाणी पुरवठा करणारी विहीर, पाण्याच्या टाक्यांची वैद्यकीय अधिकार्‍यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. तसेच तीन ठिकाणी लागलेली गळती करण्याचे आदेश दिले. पिंपरी येथील गॅस्ट्रोची साथ आटोक्यात आणण्यासाठी पाच वैद्यकीय पथकाद्वारे गावात सर्वेक्षण करुन नागरिकांची तपासणी मोहीम राबवण्यास सुरवात केली आहे.