Breaking News

लोणंदमधील पालखी मार्गावरील अतिक्रमणे जमीनदोस्त

लोणंद, दि. 4 (प्रतिनिधी) : शहरातील राज्यमार्ग असणार्‍या व महत्वाचा रस्ता असणार्‍या सातारा-लोणंद रस्त्यावरील सुमारे पावणे दोनशे अतिक्रमणे सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केली. दरम्यान, अतिक्रमणे हटवल्यानंतर पालखी मार्गाने मोकळा श्‍वास घेतला.
लोणंद गावातून जाणार्‍या सातारा-पुणे या रस्त्याच्या दोन्ही बाजूला टपरी, खोकी, शेडची मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाल्याने वांरवार वाहतुकीची कोंडी होत होती. त्यामुळे पादचार्‍यांना जीव मुठीत धरून चालावे लागत होते. वारंवार कारवाई करूनही पुन्हा अतिक्रमणे होत होती. लवकरच संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पालखीचा सोहळा या मार्गावरून जाणार असल्याने अतिक्रमणे काढणे गरजेचे होते. या अतिक्रमणाबाबत काही माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी आपले सरकार पोर्टलवर तक्रारी केल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण केलेल्या लोकांना नोटीसाही धाडल्या होत्या. परंतू, नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमण काढली नसल्याने प्रशासनाला अतिक्रमण हटविण्याची मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला.
लोणंद येथील शासकीय विश्रामगृहात खंडाळ्याचे तहसिलदार शिवाजी तळपे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता युवराज देसाई, शाखा अभियंता सुर्यकांत कुंभार, लोणंद नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी, लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि संदिप भोसले यांचा समावेश होता. मोठ्या पोलिस फौजफाट्यासह लोणंद-सातारा रस्त्याच्या अहिल्यादेवी चौक ते गोटे माळ येथील अतिक्रमण काढण्यात आली.
रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजुला 10 मीटर अंतरावर रेषा आखण्यात आली. यावेळी रस्त्याचा मध्य करण्यावरून अधिकारी, व्यापारी व नागरिकांची वादावादी झाली. त्यानंतर मध्यभागी मार्किग करून हद्द निश्‍चित करून अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली. कोणत्याही  पदाधिकार्‍यांच्या हस्तक्षेपाशिवाय अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली.
लोणंद पोलीस ठाण्याचे शास्त्री चौकात असलेल्या पोलीस मदत केंद्रांची इमारतीचे अतिक्रमण झाल्याने ही इमारत जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे इतर अतिक्रमण धारकांनी फारसा विरोध केला नाही. लोणंद नगरपंचायतीच्या शॉपिंग सेंटरची भिंत, एका बँकेचे एटीएम व इमारतीचा काही भागावर मार्किंग करण्यात आले आहे. या मोहिमेनंतर रस्त्याचे सपाटीकरण करण्यात येणार आहे. तसेच स्वत:हून अतिक्रमणे काढण्यात आली का नाही याची खात्री करून ज्यांनी अतिक्रमणे काढली नाही त्यांची अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. अतिक्रमणात ज्यांची टपरी, खोकी, हातगाडे गेले आहेत. त्यांचे लोणंद नगरपंचायतीने पुर्नवसन करण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.