नाबार्डच्या वतीने कृषी जलदूत प्रशिक्षण कार्यक्रम
675 गावांत राबविण्यात येणार उपक्रम
बुलडाणा, दि. 05 - नाबार्डच्या वतीने जिल्ह्यात 675 गावांमध्ये पाणी हेच जीवन हा उपक्रम जलजागृती संदर्भात राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी 52 जलदूतांची निवड करण्यात आली असून प्रत्येक तालुक्यत दोन टिम काम करणार आहे. या कृषी जलदूतांचा प्रशिक्षण कार्यक्रम आज बुलडाणा रेसीडेन्सी क्लबच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नाबार्डचे जिल्हा प्रबंधक सुभाष बोंदाडे, अग्रणी बँक जिल्हा व्यवस्थापक प्रभाकर श्रोते, समन्वयक दिलीप जगताप, मुख्य प्रशिक्षक वैशाली केनकर, अरूण भिडे आदी उपस्थित होते.याप्रसंगी श्री. बोंदाडे यांनी पाणी हेच जीवन हा उपक्रम जिल्हाभर प्रभावीपणे राबविण्याबाबत सूचना दिल्या. तसेच उपक्रमाची माहिती दिली. तसेच जलदूतांनी गावकर्यांना पावसाचे पाणी अडविणे, पाणी पुनर्भरण करणे, पावसाच्या पाण्याचा संचय करून उपयोग करणे आदी बाबींवर यावेळी प्रकाश टाकण्यात आला. जलदूतांनी शेतकर्यांना पीक घेताना पावसात खंड पडल्यास सिंचनाचे नियोजन करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी मुख्य प्रशिक्षक श्रीमती केनकर व अरूण भिडे यांनी मार्गदर्शन करीत पाण्याचे महत्व शेतकर्यांना जलदूतांनी पटवून देण्याचे आवाहन केले. यावेळी विविध गावांची जबाबदारी दिलेले जलदूत उपस्थित होते.
