Breaking News

राज्यातील टंचाईग्रस्त, दुष्काळग्रस्त गावांतील विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्यांमध्येही पोषण आहार

पुणे, दि. 30 - राज्यातील टंचाईग्रस्त किंवा दुष्काळग्रस्त गावांतील विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्यांमध्ये शिक्षण विभागातर्फे पोषण आहार देण्याचा निर्णय घेण्यात आला  असून यांतर्गत विद्यार्थ्यांना अठवड्यातून तीन दिवस फळे व अंडी देण्यात येणार आहेत. मात्र यासाठी बायोमॅट्रीक्स हजेरीची अट घातली आहे त्यामुळे आता जिथं दोन  वेळचं अन्न मिळायची भ्रांत अशा ठिकाणी लोकसहभागातून बायोमॅट्रीक्स मशिन कशी आणणार असा प्रश्‍न आता उपस्थित केला जात आहे. 
शालेय पोषण आहाराविषयक सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने उन्हाळी सुटीच्या काळात विद्यार्थ्यांना पोषण आहारात दूध,  अंडी व फळे देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शासनाने उन्हाळी सुटीतल्या पोषण आहाराला मान्यता दिली आहे. त्यासाठी प्रति विद्यार्थी प्रति दिन पाच रुपये या  प्रमाणे तीन दिवसांसाठी 15 रुपये देण्याचे निश्‍चित केले आहे. परंतु हा पोषण आहार त्या विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी त्यांची बायोमॅट्रीक्स हजेरी अनिवार्य आहे. ज्या  विद्यार्थ्यांची बायोमॅट्रीक्स हजेरी आहे त्यांनाच हा पोषण आहार मिळेल असे शासनाच्या उपसचिव डॉ.सुवर्णा खरात यांच्या सहीनिशी असणार्‍या शासन निर्णयात  म्हणण्यात आले आहे.
मुख्य म्हणजे दुष्काळग्रस्त भागातील शाळांना हे बायोमॅट्रीक्स मशिन बसविण्यासाठी कोणतेही वेगळे अनुदान शासनाने दिले नसून शाळांनी लोकसहभाग, ग्रामनिधी,  जिल्हानिधीतून बायोमॅट्रीक्स मशिन बसवावेत अश्याही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अतिदुर्गम भागात ज्या ठिकाणी बायोमॅट्रीक्स हजेरी नसणार तेथील  विद्यार्थ्यांनी उपाशीच रहावे का? असा प्रश्‍न आदिवासी शिक्षकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.