Breaking News

समाजभान जपणार्‍यांच्या कार्याला बळ देऊ याः किशोर बळी


बुलडाणा, दि. 11 - सामाजिक बांधिलकीच्या पोटतिडकीतून समाजभान जपणार्‍या विधायक कार्याला एक माणूस म्हणून आपण सर्वतोपरी बळ दिले पाहिजे. कारण आज विधायक आणि रचनात्मक कार्य करणार्‍यांची समाजाला खरी आवश्यकता आहे. बुलडाणा परिसरात नंदनवन नावाचे अनाथालय अनाथ आणि गरजू मुलांच्या आयुष्यात नक्कीच नंदनवन फुलवेल असा आशावाद सुप्रसिद्ध बहुआयामी कलावंत किशोर बळी यांनी व्यक्त केला.
काल गर्दे वाचनालयाच्या शताब्दी वर्षानिमित्त्य बुलडाण्याच्या नंदनवन मित्रपरिवारांनी किशोर बळी यांचा हास्यबळी डॉट कॉम या कार्यक्रमाचे आयोजन अनाथलाच्या मदतीसाठी करण्यात आले होते. याप्रसंगी बुलडाण्याच्या नगराध्यक्षा नजमुन्नीसा मो. सय्यद, अतिरिक्त पोलीस अधिक्षक श्‍वेता खेडकर न.पा.मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण, डॉ. गणेश गायकवाड, नगरसेवक मो. सज्जाद, गर्दे वाचनालयाचे अध्यक्ष केशवराव एकबोटे, गोकुल शर्मा, उदय देशपांडे, इ. प्रामुख्याने उपस्थित होते. नंदनवन या अनाथालयातील मुलांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. श्‍वेता खेडकर यांची नागपूर येथे बदली झाल्याबद्दल त्यांचा रोप देऊन निरोप देण्यात आला. नंदनवन परिवाराला सातत्याने किराणा पुरविणार्‍या अनिरूद्ध माकोने यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. श्रीमती श्‍वेता खेडकर यांनी याप्रसंगी नंदन अनाथालयाच्या बांधकामासाठी अकरा हजरांची मदत केली. नगराध्यक्ष नजमुन्निसा मो. सज्जाद यांनी त्यांच्या परिवाराकडून एकवीस हजारांची मदत जाहीर केली. गर्दे वाचनालयाचे मुख्य कार्यवाह मीनानाथ तारे यांचे दु:खद निधन झाल्याबद्दल त्यांना कार्यक्रमाच्या सुरवातीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा संचालन नरेंद्र लांजेवार यांनी केले.
हास्यकलावंत किशोर बळी यांच्या कार्याचा परिचय अरवींद शिंगाडे यांनी करून दिल्यानंतर हास्यबळी डॉट कॉम या कार्यक्रमाला सुरूवात झाली. विनोद निर्मितीबद्दल बोलतांना किशोर बळी म्हणाले की, आजुबाजूच्या व्यक्तींच्या रोजच्या व्यवहारांकडे त्यांच्या बोलचालीकडे बारकाईने बघीतले तर विसंगती दिसून येते. याच विसंगतीतून विनोद निर्मिती होते, असे ते म्हणाले. किशोर बळी यांनी अनेक विनोदी किस्से सादर करून सामाजिक बांधिलकी व माणूसकी जपण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. समारोप करतांना
“तुझ्या दारी जर आले कोणी उपाशी-तापाशी
थोडी असू दे भाकरी त्यांच्यासाठी तुझ्यापाशी
ज्यांच्या डोळ्यात आसवे उठे काळजात कळ
त्यांना मायेच्या शब्दांनी दे रे जगण्याचे बळ
असे करीत रहावे कोणासाठी काही बाही
स्वत:साठीच जगतो, खरा माणूस तो नाही’’
ही रचना सादर करून श्रोत्यांना अंतर्मुख केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महेंद्र सोभागे यांनी केले. या कार्यक्रमास बुलडाणेकर रसिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली होती..
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अजय दराखे, मिलिंद चिंचोळकर, नेमीनाथ सातपुते, सचिन बल्लाळ, प्रशांत लहासे, रितेश खडके, सुरेश कावळे, ललिता सरोदे,काळुसे सर, गजानन देशमुख, प्रमोद टाले इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले.