Breaking News

नुकसानग्रस्त भागाची सभापती फटांगरेंकडून पाहणी

अकोले, दि. 09 - तालुक्याच्या पठार घारगांव, बोटा, माळवाडी, केळेवाडी, अकलापूर गावाला काल वादळी वार्‍यासह आलेल्या जोरदार पावसाने शेतातील पिकांचे, घरांचे व जनावरांच्या गोठ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या असून कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय फटांगरे यांनी पठार भागातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.  
दोन तास चाललेल्या पावसाने व त्यातही       गारांच्या मार्‍यामुळे केळवाडी हे जवळपास पूर्ण बागायती गाव आहे. येथील डाळींब, द्राक्षाच्या बागा, टोमॅटो व कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले. या पावसाने अनेक शेतकर्‍यांच्या उभ्या फळबागांमधील फळे गळून गेली. पाने व फुलोरा झडला. तर काही ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत. या पावसाने परिसरातील काही तलाव पूर्ण भरले तसेच लहान बंधारे पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागल्याने अकलापूर रस्ता पाण्याखाली जाऊन वाहतुक बंद झाली होती. दुपारी साडेतीन वाजता सुरु झालेले हे थैमान सुमारे दोन तास सुरु होते. या वादळाने व गारांनी रस्त्याच्या कडेच्या बर्‍याच झाडांचे ही मोठे नुकसान झाले.  वार्‍याच्या मार्‍याने झाडे उन्मळून पडली.
रविवारी आ.बाळासाहेब थोरात व आ. डॉ. सुधीर तांबे यांनी प्रशासनाला व पदाधिकार्‍यांना नुकसानग्रस्त भागाला भेट देवून तेथील परिस्थितीची पाहणी करुन तातडीने नुकसानीचे पंचनामे करुन शासनास सादर करण्याचे आदेश दिले आहे. यानुसार सभापती अजय फटांगरे, तहसिलदार साहेबराव सोनवणे, कृषी अधिकारी कारभारी नवले,  सरपंच विकास शेळके, बबन लामखडे, बबन कुर्‍हाडे, राजू लामखडे, बापू जाधव आदींसह ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नुकसान ग्रस्त भागाला समक्ष भेटी देवून पाहणी केली. घरपडझडीमुळे नुकसान झालेल्या नागरीकांची विचारपुस केली. तसेच नागरिकांनी घरे, गोठे तसेच शेतातील पिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती दिली.