Breaking News

अकोलेत सुवर्णपदक विजेत्यांचा सत्कार

अकोले, दि. 09 - अकोले सारख्या मोठया खेडयातील क्रीडापटू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवतात ही बाब अकोलेकरांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे असे प्रतिपादन प्रतिथयश उद्योजक नितीन गोडसे यांनी केले.
क्रिएटीव्ह आर्टस् अ‍ॅकेडमी व रुद्रा जनहित प्रतिष्ठाणच्या वतीने योगा व बुध्दीबळ या क्रीडा प्रचारात श्रीलंकेमध्ये कोलंबो येथे दक्षिण आशियाई स्टुडंट ऑल्मिपियाड स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्यांचा जाहिर सत्कार पॉलीटेक्नीकच्या प्रांगणात आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जे. डी. आंबरे पा. होते. या सत्कार समारंभास अर्थवेद पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बी. एम. महाले, मनिषा गोडसे, क्रीडा प्रशिक्षक दिलीप झोळेकर, प्रा. डी. के. वैद्य, पालक व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
श्री. गोडसे पुढे म्हणाले की, अकोले सारख्या ठिकाणी कोणतीही अत्याधुनिक सुविधा, तंत्र, मार्गदर्शक नसतांना जिद्द व चिकाटीच्या जोरावर अश्‍विनी काळे, प्रियंका दुटे, पूजा बिन्नर व अर्शद पठाण यांनी सुवर्णपदक मिळविले. एकेकाळी महिनाभर चालु असलेल्या ऑलीम्पीक स्पर्धेत सुवर्णपदकाची संपूर्ण भारत देश पहात होता, अशा परिस्थितीत या विद्यार्थ्यांनी क्रीडाक्षेत्रात मानाचा तुरा रोवला ही बाब अभिमानाची आहे.
तसेच अर्शद सारखा विद्यार्थी बुध्दीबळ स्पर्धेत कोणाचेही मार्गदर्शन न घेता एकलव्यासारखे मोबाईल ऑनलाईन व मित्रांनी पाठविलेल्या पुस्ताकातून स्वत: शिकत हे यश संपादन केले. त्याला जर योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन मिळाले तर तो भविष्यात देशाचे नाव उज्वल करीन. या मदतीसाठी समाजाने पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये जे. डी. आंबरे पा. म्हणाले की, या क्रीडापटुंचा सत्कार व त्यांचा गौरव नसुन संपूर्ण तालुक्याचा गौरव असुन कॉलेज सुरु झाल्यानंतर या सुवर्णपदक विजेत्यांचा सत्कार संस्थेमार्फत करणार आहे. प्रा. बी. एम. महाले म्हणाले की, सोनं चिंधीत बांधले म्हणुन त्याचे मूल्य कमी होत नाही. विद्यार्थ्यांमधील टॅलेंट ही बाब तशिच आहे. फक्त त्यांनी शॉर्टकटने यश मिळवू नये ते फार काळ टिकत नाही असा सल्ला दिला.
सत्कारमूर्ती अश्‍विनी काळे म्हणाली की, श्रीलंकेतील विजयाचा आनंद जेवढा होता, त्यापेक्षाही मातीने केलेला हा सत्कार मोठा मोलाचा आहे.  विद्यार्थ्यांनी त्यांचे आवडीच्या क्षेत्रात करीअर करावे. यावेळी अश्‍विनी काळे, पूजा बिन्नर, प्रियंका टुटे व अर्शद पठाण यांनी श्रीलंकेतील स्पर्धेतील अनुभव विषद केले.
सुवर्णपदक विजेत्यांचा मान्यवरांचे हस्ते शाल, गुच्छ, व मानपत्र देवून सन्मानीत करण्यात आले. मानपत्राचे वाचन चंद्रविलास गव्हाणे यांनी केले. स्वागत सचिन शिंदे यांनी केले. प्रास्ताविक सुभाष खरबस यांनी केले. सुत्रसंचालन भाऊसाहेब कासार यांनी तर आभार प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दत्ता नवले, रोहिदास धुमाळ, विशाल पगारे, अमोल आरोटे यांनी परिश्रम घेतले.