Breaking News

अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचार्‍यांचे पालकमंत्री संपर्क कार्यालयावर मोर्चा

। वेतनवाढीसाठी विशेष लक्ष घालून प्रयत्न करण्याचे पालकमंत्रींयांचे आश्‍वासन 

अहमदनगर, दि. 30 - अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचार्यांच्या विविध प्रश्‍न व प्रलंबीत मागण्यांसाठी अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचारी युनियनच्या वतीने पालकमंत्री यांच्या प्रेमदान चौक येथील संपर्क कार्यालयावर मोर्चाने येवून निदर्शने करण्यात आली. आंदोलनात सहभागी महिलांनी जोरदार घोषणाबाजी करुन, ठिय्या मांडला. पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी आंदोलकांशी दुरध्वनीवर संपर्क साधून, सदर प्रश्‍न सोडविण्यासाठी महिला व बालविकास मंत्री पंकजा पालवे-मुंडे यांची भेट घेवून चर्चा करणार आहे. तसेच वेतनवाढीसाठी विशेष लक्ष घालून प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन दिले.  
जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतंर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना मानधन ऐवजी वेतन देण्यात यावे. वेतनवाढ समितीच्या शिफारशीची तातडीने अंमलबजावणी व्हावी. अंगणवाडी कर्मचार्यांना दरमहा पेन्शन, ग्रॅच्युटी, भविष्य निर्वाह निधी व इसाआयसी योजनेचा लाभ द्यावा. सेविका व मदतनिसांचे वेतन (मानधन) महागाई भत्त्याशी जोडावे. प्राथमिक शाळेप्रमाणे अंगणवाडी केंद्रांना एक महिन्याची उन्हाळी सुट्टी द्यावी. मदतनिसांचे मानधन वाढवावे. नागरी भागातील बालवाडीत सेवा केलेल्या व आता अंगणवाडी केंद्रात नेमणुक झालेल्या सेविकेची बालवाडीतील सेवा लाभासाठी ग्राह्य धरण्यात यावी. सन 2005 पासून मृत्यू, राजीनामा, सेवेतून काढलेल्या व सेवा कार्यकाळ पुर्ण केलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनिसांना एक रकमी योजनेचा लाभ मिळावा व प्रकल्पाच्या उद्दीष्टांव्यतिरित इतर कामाचा भार न लादण्याची मागणी करण्यात आली आहे. आंदोलनात कॉ.मदिना शेख, माया जाजू, शोभा देशमुख, ज्योती जोशी, शांता कोरडे, अलका दरंदले, शोभा लांडे, अलका तांदळे, मंदा शिंदे, भगिरथी पवार, सुनंदा काळे, कुसूम थोरात आदिंसह अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.