Breaking News

उपकाराच्या भावनेचा दर्प तोडण्यासाठीच शेतकरी संपावर

दि. 31, मे - मागील सरकारने शेतकर्‍यांना काहीच दिले नाही.आम्ही काही तरी देण्याचा प्रयत्न करतोय...सरकारच्या या भाषेतून शेतकर्‍यांवर उपकार केल्याचा दर्प जाणवतो आहे. खरतर आजवरच्या सत्ताधार्‍यांनी नागवलं म्हणूनच या सरकारला एक संधी दिली. मात्र या सरकारचे पायही शेतकर्‍यांच्या संदर्भात अपशकूनी ठरले. म्हणून सगळ्याच आजीमाजी सत्ताधार्‍यांना त्यांची औकात दाखविण्यासाठी शेतकरी आपल्या जातीवर उतरला आहे.
आई घरात जेवायला देत नाही,बाप बाहेर हात पसरू देत नाही. अशा कोंडीत सापडलेलं पोरगं एकतर आत्महत्या करील नाहीतर आपला हक्क मिळविण्यासाठी कुटुंबाविरूध्द बंड करून उठेल.अशा पोरासारखी शेतकर्याची अवस्था आहे.
वर्षानूवर्ष नापिकी, अवर्षन, गारपीट अशा नैसर्गीक संकटामुळे जमिनीत पेरलेलं हाती येत नाही.एखाद्या वर्षी चुकून हवामान अनुकुल मिळते .पिक जोम धरते. खर्चाची तोंड मिळवणी होऊन यंदा कर्ज फिटेल, उपवर कन्येचे हात पिवळे होतील, पोराच्या कालेजात शिक्षणाचा खर्च भागवता येईल. असे स्वप्न रंजन सुरू असतांनाच माल बाजारात येतो आणि या संधीची वाट पहात बसलेले दलाल मनाला येईल त्या भावाने मालाची खरेदी करतात. मिळालेल्या पैशातून पिकवण्यासाठी झालेला खर्चही भागत नाही. सुलतानी संकटाने मारलेला शेतकरी बाजारातील दलालांकडूनही लुटला जातो. या दोन्ही घटनांमध्ये मायबाप सरकारकडून जगण्या एव्हढी तरी मदत मिळेल या अपेक्षेकडे डोळे लावून बसतो. इथेही निराशाच पदरी पडते.
जगाचा पोशिंदा म्हणविणारा हा भुमीपुत्र प्रसंगी स्वतः उपासमार सोसतो.कुणाविषयी तक्रार त्याच्या चेहर्‍यावर दिसत नाही. काळी आई, आपलं कुटुंब, करडपारड या विश्‍वात तो रममान असताना सावकाराचा तगादा पाठ सोडत नाही. निसर्ग नावाची आई साथ देत नाही सरकार नावाचा जखमेवर मलम लावण्याऐवजी भिकेचा तुकडा फेकून मीठ चोळण्याचा नालायकपणा करतो. या कोंडीत सापडलेल्या बळीराजाला मग आपल्या सर्ज्याला बांधण्यासाठी वापरला जाणारा कासरा आपल्या गळ्याचा फास म्हणून वापरण्याशिवाय अन्य पर्याय उरत नाही. हजारो भुमीपुत्रांनी हा पर्याय चोखाळला.पण निर्दयी सरकारवर कुठलाच परिणाम झाला नाही म्हणून बस्स झाल्या आत्महत्या! आता मरायच नाही, लढायच.. निर्लज्ज राज्यकर्त्या जमातीला त्यांची औकात दाखवायची... या निर्धाराने संपाचं हत्यार उपसलं गेलयं. या संपामुळे शेतकर्‍यांविषयी जाणीवपुर्वक निर्माण केले गेलेले समज दुर होणार आहेत. शेतकर्यांना संघटीत करण्याचे आजवर अनेक प्रयत्न झाले पण ते फळले नाहीत.कारण त्या प्रयत्नांमध्ये कुठे ना कुठे राजकीय अभिनिवेश, स्वार्थ दडलेला होता. यावेळी शेतकरी स्वतःहुन संघटीत झाला आहे.कुठल्याही नेतृत्वाशिवाय विशेषतः शेतकर्याची तरूण पोरं आपल्या बापाने पिढ्यानंपिढ्या सोसलेल्या अन्यायाचा जाब विचारण्यासाठी स्वयंप्रेरीत लढ्यात सहभागी झाले आहेत. म्हणूनच नभुतो. असा हा लढा शेतकरी संघर्षाला वेगळी दिशा देणारा ठरणारा आहे.
शेतकर्‍यांचा हा लढा कुणा राजकीय पक्षाविरूध्द नाही. सत्ताधार्यांना विरोध आणि विरोधकांचे बळ वाढविणारा तर मुळीच नाही. कारण हे दोघेही एकाच खाणीतील काळा पाषाण आहेत. हे बळीराजाला चांगलं ठाऊक आहे.आज शेतकर्‍यांविषयी कळवळा व्यक्त करणारे संघर्ष यात्रा काढतात, मात्र जेंव्हा सत्तेवर होते, तेंव्हा फासाला लटकत असलेले शेतकर्‍याचे प्रेत दिसले नाही. आजचे सत्ताधारी तेंव्हा तत्कालीन सरकारला शेतकर्‍यांचा खुन करणारे सरकार म्हणत होते. तत्कालीन सरकारविरूध्द विद्यमान मुख्यमंत्री आकांडतांडव करीत होते. सत्तेच्या उबेत शिरताच मुख्यमंत्र्यांची भाषा बदलली. दोन वर्षात स्वतःचेच बोल मुख्यमंत्री विसरले. हे सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही त्यांची जागा दाखविण्यासाठी रूमणं हातात घेऊन आपली जात दाखविण्यासाठी शेतकरी संपावर जातोय. शेताच्या बांधावर मस्तवाल झालेल्या वळूला नाकात वेसन घालून ताळ्यावर कसे आणायचे याची कला काळ्या आईच्या लेकराला चांगलीच ठाऊक आहे. या संपातून या कलेवर शिक्कामोर्तबच होईल.