Breaking News

नक्षलग्रस्त राज्यांमधील जिल्हा पोलीस दलांना सैन्याकडून प्रशिक्षण देण्याचा केंद्राचा निर्णय

नवी दिल्ली, दि. 08 - नक्षलग्रस्त राज्यांमधील जिल्हा पोलीस दलांना सैन्याचे जवान प्रशिक्षण देण्याचा व नक्षलग्रस्त भागात सुरक्षा दलाच्या मदतीसाठी हवाई  दलाचे हेलिकॉप्टर तैनात करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. छत्तीसगडमधील सुकमा येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 25  जवान शहीद झाले होते त्या पार्श्‍वभूमीवर सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. नक्षलग्रस्त भागांमध्येकेंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पोलिसांऐवजी भारतीय  राखीव बटालियनची नेमणूक करण्यात येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे सोमवारी नक्षलग्रस्त जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची बैठक घेणार आहेत. यावेळी देशभरातील10 नक्षलग्रस्त  राज्यांमधील अधिकारी उपस्थित असून या बैठकीत नक्षलग्रस्त जिल्ह्यांमधील सुरक्षा व्यवस्था व नक्षलग्रस्त भागांचा विकास या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे.