Breaking News

पोस्टाची बँक लवकरच सुरू होणार !

सोलापूर, दि. 09 - सोलापुरात टपालखाते पोस्ट पेमेंट बँक सेवा सुरू करणार आहे. राष्ट्रीयीकृत बँका खेड्यापर्यंत जाण्यास उदासीन दिसतात. त्यामुळे खेड्यापर्यंत बँकेची सेवा पोहोचली नाही. अनेक शेतकर्‍यांना गावात बँक नसल्यामुळे शहर किंवा नजीकच्या मोठ्या गावात पदरमोड करून जावे लागते. बँकिंग क्षेत्राला खेड्यापर्यंत नेण्यासाठी नव्याने यंत्रणा उभी करता, खेड्यापर्यंत पोहोचलेल्या पोस्ट खात्याची रचना बदलत आहे.
महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांच्या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पहिली इंडिया पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी) सुरू होत आहे. पहिली बँक सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने खेड्यापर्यंत जाळे विस्तारण्यात येणार आहे.
पोस्टातून सर्व प्रकारचे बँकिंग व्यवहार करता येणार आहेत. गोवा विभागांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात पेमेंट बँक सुरू होणार आहे. यामुळे ग्राहकांना पोस्टाच्या माध्यमातून बँकिंग सेवा मिळणार आहे. देशभरातील टपाल कार्यालयांना बँकांचा दर्जा देण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे.
देशभरात पोस्ट बँकेच्या 650 शाखा सुरू करण्यात येणार आहेत. गोवा क्षेत्रात कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि संपूर्ण गोवा राज्याचा समावेश होतो. तर पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ जिल्ह्यातील सर्वच पोस्ट कार्यालये कोअर बँकिंग प्रणालीशी जोडली आहेत.
शहरासह ग्रामीण भागातील टपाल कार्यालये संगणकीकृत झाली आहेत. बचत बँक, आरडी, मुदत ठेव, वरिष्ठ नागरिक योजना, पीपीएफ, मंथली इन्कम स्किम, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र हे सर्व व्यवहार आता ऑनलाइन पद्धतीने होत आहेत.