Breaking News

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना भेटीसाठीच्या अटीचा आदेश काढणार्‍या भाजपाचा तटकरेंनी केला निषेध

सातारा, दि. 30 (प्रतिनिधी) : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटायला यायचे असल्यास आधी साबण लावून स्वच्छ आंघोळ करा व अंगाला सेंट लावा असा अजब आदेश काढणार्‍या भाजप सरकारच्या कृतीचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तीव्र शब्दात धिक्कार केला आहे. गरीब माणसांबद्दलची त्यांची भावना घृणास्पद असल्याची टीका त्यांनी केली.
कोल्हापूरहून रायगडकडे जात असताना सातारा येथे पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, दीपक चव्हाण, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सुरेंद्र गुदगे आदी उपस्थित होते.
तटकरे म्हणाले, घाम गाळणार्‍या माणसाच्या घामाचा वास येणारच. त्या गरीब माणसांच्या बाबतीत अशा पध्दतीने वागणे घृणास्पद आहे, असे तटकरे यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचाही समाचार घेतला. शेतकर्‍यांबाबत दानवे काय म्हणाले, असा सवाल करत, त्यांची वक्तव्ये पाहता आजही त्यांच्यात मनुस्मृती जागृत आहे, अशी परखड टीका त्यांनी केली.
राज्यात शासनाची प्रशासनावर पकड नाही. अधिकारीच सरकार चालवत आहेत. हे सरकार 195 आमदारांचे संख्याबळाने मजबुत, पण तितकेच दुबळे सरकार आहे. गेली दोन वर्षे पुरवणी मागण्यांवर हे सरकार चालले आहे. या सरकारचे आर्थिक नियोजन ढासळले आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादी काँठोस सक्षम विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. पुढील काळात अधिक मोठ्या प्रमाणात संघर्षाची भूमिका घेणार आहोत. राज्यातील शेतकर्‍यांना जोपर्यंत कर्जमुक्ती मिळत नाही, तोपर्यंत संघर्ष सुरूच राहणार आहे. राज्यावर सध्या साडेतीन लाख कोटीचे कर्ज असले तरी राज्याचे महसुली उत्पन्न व विकास दर पाहता आणखी कर्ज काढता येऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.
एलबीटी रद्द करण्याची घाई केल्यामुळे राज्याचे वर्षाला 8 हजार कोटीचे नुकसान झाल्याचा आरोप त्यांनी केला. ऑक्ट्रॉय वसूल करणारे मुंबई हे देशातील एकमेव शहर असून त्यातून वार्षिक 12 हजार कोटीचा महसूल मिळत होता. आता पाच वर्षे त्याची भरपाई मिळेल. त्यानंतर वर्षाला 12 हजार अधिक 8 हजार कोटीचा भार राज्य सरकारवर पडेल, असे त्यांनी सांगितले.