Breaking News

उन्नत शेती-समृध्द शेतकरी योजनेचा लाभ घ्यावा : शिंदे

सातारा, दि. 30 (प्रतिनिधी) : सन 2022 पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. या उद्दिष्ट पूर्तीसाठी चालू वषापासून खरीप व रबी हंगामात उन्नत शेती समृध्द शेतकरी मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे कृषी तंत्रज्ञान राज्यातील सर्व शेतकर्‍यांपर्यंत पोहचविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे यांनी दिली.
उन्नत शेती समृध्द शेतकरी या माहिमे अंतर्गत पिकांची प्रत्यक्षात प्राप्त होणारी उत्पादकता व पिकांची अनुवांशिक उत्पादन क्षमतेतील तफावत कमी करुन शेतकर्‍यांनी घेतलेल्या पिक कर्जाच्या रकमेपेक्षा अधिक आर्थिक उत्पन्न प्राप्त करुन देणे, आणि पिक विमा योजनेंतर्गत जास्तीत-जास्त शेतकर्‍यांना सहभागी करुन घेऊन नैसर्गिक आपत्तीपासून पिकांच्या होणार्‍या नुकसानीपासून शेतकर्‍यांना संरक्षित करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. या मोहिमे अंतर्गत चालू वर्षापासून तालुका हा कृषी विकास व उत्पादन वाढीसाठी नियोजनाचा घटक म्हणून निश्‍चित करण्यात येत आहे. त्यानुसार शेतकर्‍यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने या मोहिमेंतर्गत पिकांची उत्पादकता त्यांच्या अनुवांशिक उत्पादन क्षमतेपर्यंत वाढविण्याचा प्रयत्न करणे व पिकांमध्ये वैविध्यपूर्णता (Diversification) करणे, पिकांचा उत्पादन खर्च कमी करणे, शेतमालाच्या बाजार भावातील नियमित चढ-उतार लक्षात घेऊन शेतमाल विक्रीचे तंत्र शेतकर्‍यांना अवगत करुन देणे, शेती पूरक व्यवसायांना चालना देणे, बाजारपेठ आधारीत कृषी उत्पादनाबाबत निर्णय घेण्याच्या दृष्टीने राज्यातील शेतकर्‍यांच्या उत्पादक कंपन्यांद्वारे शेतकर्‍यांचे संघटन करणे व शेतकर्‍यांच्या या कंपन्यांची व्यावसायिक क्षमता बांधणी करणे, काढणी पश्‍चात शेतमाल हाताळणी व मूल्यवर्धन करणे इ. बाबींवर भर राहील.
या मोहिमे अंतर्गत पिक प्रात्यक्षिके यामध्ये जिल्ह्यातील विविध पिकांची उत्पादकता वाढविण्याच्या हेतूने तंत्रज्ञान प्रसाराचे साधन म्हणून पिक प्रात्यक्षिके शेतकर्‍यांच्या शेतावर आयोजित करणे.
चालू वर्षी या योजनेत भात पिकाचे 46 प्रकल्प, कडधान्य योजनेतून मुग पिकाचे 3 प्रकल्प, उडीद पिकाचे 2 प्रकल्प, हरभरा 46, भरडधान्य योजनेतून ज्वारी 220, बाजरी 130 तर मका पिकाचे 110 प्रकल्पांवर पिक प्रात्यक्षिकाचे नियोजन केले आहे. दि. 25 मे 8 जून हा रोहिणी नक्षत्राचा कालावधी उन्नत शेती-समृध्द शेतकरी पंधरवडा म्हणून राबविण्यात येईल. शेतकरी प्रशिक्षण सहल, सुक्ष्म सिंचन, कृषी यांत्रिकीकरण व अन्य पायाभूत व भौतिक सुविधा यामध्ये कांदा चाळ, शेडनेट, ग्रीन हाऊस, सामुदायिक शेत तळे, प्लास्टीक अस्तरीकरणे या पायाभूत व अन्य भौतिक सुविधांसाठी अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. तरी या मोहिमे अंतर्गत विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी घ्यावा, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.