Breaking News

’ऑनलाईन’ भरण्यामध्ये पुणेकर वीजग्राहक राज्यात आघाडीवर

पुणे, दि. 11 - महावितरणच्या संकेतस्थळ आणि मोबाईल अ‍ॅपद्वारे वीजबिलाची रक्कम ’ऑनलाईन’ भरण्यामध्ये पुणेकर वीजग्राहक राज्यात आघाडीवर आहेत. गेल्या  आर्थिक वर्षात राज्यात सर्वाधिक 1193 कोटी 85 लाख रुपयांच्या वीजबिलांचा ’ऑनलाईन’ भरणा पुणे परिमंडलातील 66 लाख 50 हजार वीजग्राहकांनी केला  आहे.
महावितरणाने लघुदाब वीजग्राहकांसाठी ’ऑनलाईन’ बिल भरण्यासाठी www.mahadiscom.in या वेबसाईटद्वारे सोय उपलब्ध करून दिली होती. त्यानंतर जून 2016 मध्ये  वीजग्राहकांसाठी मोबाईल अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली. या अ‍ॅपद्वारे चालू आणि मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ऑनलाईन भरणा करण्यासाठी नेटबँकींग,  क्रेडीट/डेबिट कार्डासह मोबाईल वॅलेट आणि कॅश कार्ड्सचा पर्याय उपलब्ध आहे तर भरलेल्या पावतीचा तपशीलही मिळत आहे. वीजग्राहकांना त्यांच्या एकाच  खात्यातून स्वतःच्या अनेक वीजजोडण्यांबाबतही सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे पुणे परिमंडलात सन 2015-16 च्या तुलनेत ऑनलाईन वीजबिल भरण्यामध्ये नुकत्याच  संपलेल्या 2016-17 या आर्थिक वर्षात 333 कोटी 29 लाख रुपयांनी तर ग्राहकसंख्येत 19 लाख 15 हजारांनी वाढ झालेली आहे.
वीजबिलाच्या ’ऑनलाईन’ भरणामध्ये आघाडीवर असलेल्या पुणे, भांडूप आणि कल्याण परिमंडलात सन 2016-17 मध्ये मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत तब्बल  247 ते 333 कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. या वर्षात पुणे-1193 कोटी 84 लाख, भांडूप -1031 कोटी 81 लाख तर कल्याण परिमंडलात 798 कोटी 86  लाख रुपयांच्या वीजबिलांचा भरणा झाला आहे. याशिवाय (कंसात 2015-16 मधील भरणा) नाशिक परिमंडलात 314 कोटी (271 कोटी), नागपूर- 239 कोटी  (118 कोटी), कोल्हापूर- 190 कोटी 7 लाख (135 कोटी), बारामती 228 कोटी (151 कोटी) आणि औरंगाबाद परिमंडलात 177 कोटी (125 कोटी)  रुपयांच्या वीजबिलांचा भरणा झाला असून ’ऑनलाईन’ला वाढता प्रतिसाद आहे.
पुणे परिमंडलात सन 2016-17 मध्ये दरमहा सरासरी 99 कोटी 48 लाख रुपये ’ऑनलाईन’ भरणा झाला तर ग्राहकसंख्याही 5 लाख 54 हजारांवर गेली आहे.  सन 2015-16 मध्ये ही सरासरी दरमहा 71 कोटी 71 लाख रुपये तर ग्राहकसंख्या 3 लाख 94 हजार होती. गेल्या एप्रिल महिन्यात पुणे परिमंडलातील 6 लाख  75 हजार वीजग्राहकांनी उच्चांकी 113 कोटी 4 लाख रुपयांचा ’ऑनलाईन’ भरणा केला आहे. महावितरणकडून लघुदाब वीजग्राहकांसाठी वेबसाईट तसेच मोबाईल  अ‍ॅपच्या माध्यमातून ’ऑनलाईन’ बिल भरणासह इमेलद्वारे वीजबिल मिळवण्याची सोय सेवा उपलब्ध करून दिली आहे. गो-ग्रीन अंतर्गत तसेच वीजबिलाच्या छापील  कागदाऐवजी फक्त इमेलचा पर्याय स्वीकारल्यास दरमहा तीन रुपये सूट दिली जात आहे.