Breaking News

शेतकरी कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानीची पुणे ते मुंबई पदयात्रा

सांगली, दि. 11 - शेतक-यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दि.  22 ते 30 मे या कालावधीत पुणे ते मुंबई अशी आत्मक्लेश पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. प्रकाश पोफळे  यांनी दिली.
महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन करून दि. 22 मे रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या आत्मक्लेश पदयात्रेस सुरूवात होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी  आकुर्डी येथे मुक्काम केला जाणार आहे. दि. 23 मे रोजी वडगाव येथे ही पदयात्रा पोहोचेल, तर दि. 24 मे रोजी मावळ तालुक्यातील वाकसई येथे शेतक-यांशी  संवाद साधला जाणार आहे.
दि. 25 मे रोजी खोपोली येथे या पदयात्रेचा मुक्काम असेल. दि. 26 मे रोजी पनवेल तालुक्यातील ठोंबरेवाडी येथे पदयात्रा पोहोचणार आहे. दि. 28 मे रोजी वाशी  येथे मुक्काम करून दि. 29 मे रोजी ही पदयात्रा मुंबई येथील लालबाग येथे पोहोचणार आहे. त्याठिकाणी राज्यभरातील हजारो शेतकरीही सहभागी होणार आहेत. दि.  30 मे रोजी ही पदयात्रा राजभवन येथे जाणार आहे. तिथे राज्यपाल यांच्यासमोर शेतक-यांची व्यथा मांडली जाणार आहे.
या पदयात्रा कालावधीत शेतकरी देतील, ते खाऊन व निवारा मिळेल तिथे मुक्काम करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ही आत्मक्लेश पदयात्रा यशस्वी केली  जाणार आहे. या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी राज्यातील सहा लाखाहूनही अधिक शेतक-यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे अर्ज भरून दिले आहेत. हे सर्व अर्ज  राज्यपाल यांच्याकडे सादर केले जाणार आहेत. या आत्मक्लेश पदयात्रेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने  सहभागी होणार असल्याचेही प्रा. प्रकाश पोफळे यांनी सांगितले.