Breaking News

सहिष्णूता, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे विद्यापीठांकडून संरक्षण होणे आवश्यक - राज्यपाल

पुणे, दि. 30 - विद्यापीठे आणि उच्चशिक्षणाच्या क्षेत्रातील संस्थांनी सहिष्णूता, खुलेपणा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण आणि संवर्धन केले पाहिजे, असे  प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.
‘फर्ग्युसन गौरव‘ आणि ‘फर्ग्युसन अभिमान‘ पुरस्कारांचे वितरण, आज राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्याहस्ते फर्ग्युसन कॉलेजच्या के. फिरोदिया सभागृहात  करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, द फर्ग्युसियन्स संस्थेचे अध्यक्ष यशवंत मेहेंदळे, चेअरमन ड. विजय सावंत, एअर  मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, उपाध्यक्ष टी.बी बहिरट, सचिव यशवंत मोहोडे उपस्थित होते.
यावेळी फर्ग्युसन कॉलेजचे माजी विद्यार्थी व माजी गृह सचिव डॉ. माधव गोडबोले यांना राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते फर्ग्युसन गौरव पुरस्कार देवून  गौरविण्यात आले. तसेच उद्योगपती लीला पूनावला, प्रसिध्द युरोलॉजिस्ट डॉ. सुरेश पाटणकर, शास्त्रीय गायक महेश काळे यांना फर्ग्युसन अभिमान पुरस्कार देवून  गौरविण्यात आले. मरणोत्तर कीर्तीचक्र पुरस्कार अर्पण करण्यात आलेले सेकंड लेफ्टनंट स्वर्गीय ऋषी मल्होत्रा यांनाही फर्ग्युसन अभिमान पुरस्कार अर्पण करण्यात  आला. फर्ग्युसियन्सचे अध्यक्ष यशवंत मेहेंदळे यांनाही यावेळी स्मृतिचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.
राज्यपाल श्री.राव म्हणाले, आपण विचार आणि दृष्टिकोनाच्या बहुविविधतेचा आदर करायला हवा. हिंसा, वर्चस्ववाद याला विद्यापीठ आणि संस्थांच्या परिसरात थारा  असता कामा नये. शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठात सर्व प्रकारच्या विचारांना खुले स्थान असायला हवे. फर्ग्युसन कॉलेजला मोठा इतिहास आहे. या कॉलेजचे  संस्थापक, प्राचार्य तसेच विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. लोकमान्य टिळक, आगरकर, रानडे यांनी राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्वपूर्ण  योगदान दिले आहे, असे सांगून राज्यपाल श्री. राव म्हणाले, भारतात गुरुदक्षिणा देण्याची पध्दत आहे. आयआयटी, मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षण  संस्थेसाठी 300 कोटींचा मदत निधी उभारला आहे. या प्रमाणेच फर्ग्युसन कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी मदत निधी उभा करुन ‘गुरुकुल दक्षिणा‘ ही संकल्पना  रुजवावी. तसेच या निधीतून गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च भागवावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. आपले आयुष्य घडविण्याचे काम शिक्षक करतात.  म्हणूनच आपल्या आयुष्याला कलाटणी देणार्‍या शिक्षकांना स्मरणात ठेवून त्यांच्या प्रती आपण सदैव ऋणी असणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे  प्रास्ताविक विजय सावंत यांनी केले. तर सुत्रसंचालन ज्योती देशपांडे यांनी केले. यशवंत मोहोड यांनी आभार मानले.