Breaking News

शेतकर्‍यांना आधी मोबदला मग काम : आ. कडू

अकोले, दि. 11 - खेड तालुक्यातील शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍नांना न्याय मिळवून देण्यासाठी तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. जो पर्यंत एचपीगॅस पाईप लाईनचे कामास वापरण्यात आलेल्या जागेचा चालू बाजारभावाचे 5 पट मोबदला शेतकर्‍यांना मिळत नाही तो पर्यंत या गॅस पाईप लाईनचे काम सुरु होऊ देणार नाही असा खणखणीत इशारा सरकारला प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे.
शेतकरी संघटनेच्या वतीने दौन्डकरवाडीत (ता.खेड) शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी आमदार बच्चू कडू मेळाव्यास मार्गदर्शन करताना बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर शेतकरी बचाव आंदोलनचे अध्यक्ष गजानन गांडेकर, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेड महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शिवाजीराव नांदखिले, शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, जालना जिल्हा अध्यक्ष गजानन पाटील, जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते, संयोजक वस्ताद दौडकर, दत्ताजी देसाई, माजी सरपंच सर्जेराव दौडकर, सरपंच सुभाष वाडेकर, माजी चेअरमन रामभाऊ साबळे, लक्ष्मण शिंदे, संजय भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतकरी मेळाव्यात संघटनेच्या नामफलकाचे अनावरण कालिदास आपेट यांचे हस्ते करण्यात आले. या मेळाव्यात खेड तालुक्यातील शेतकर्‍यांचे विविध प्रश्‍नांकडे केंद्र आणि राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुसंवाद साधून तालुक्यात एचपीगॅस पाईप लाईनचे काम शेतकर्‍यांना विश्‍वासात न घेता परस्पर सुरु करण्यात आल्याने शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त करीत कामास तीव्र विरोध केला.
आमदार बच्चू कडू यांनी प्रभावी मार्गदर्शन करून अन्याय दूर होई पर्यंत आंदोलन केले जाईल असा इशारा दिला. ते म्हणाले, मोबदल्याशिवाय गॅस पाईपचे काम होऊ देणार नाही. बाधित शेतकरी आणि नागरिकांना प्रथम चालू बाजारभावाचे पाच पट मोबदला नंतरच लाईनचे काम अन्यथा या मागणसाठी सर्वत्र तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी मेळाव्यात दिला. राज्यात शेती करणे परवडत नाही. शासन मदत करीत नाही. शेतमालाला हमी भाव नाही. शेतीचे वीज बिल वाढले. शेतकर्‍यांनी आता वीज बिले भरू नयेत असे आवाहन त्यांनी केले.
केंद्र, राज्य सरकारने मागण्या मान्य न केल्यास न्याय हक्कासाठी शेतकर्‍यांसाठी शेतकरी संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
या मेळाव्यात शेतकर्‍यांना कर्ज माफी, शेतमाल हमीभाव, शेत जमीन चालू बाजार भावाप्रमाणे 5 पट आर्थिक मोबदला, वीज बिल 100 टक्के माफ, धरणग्रस्तांचे जमिनीचा मोबदला चालू बाजार भावा प्रमाणे मिळावा, अन्यथा जमिनी वगळाव्यात, शेतमाल निर्यात बंदी उठवावी, शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत, दरमहा 5  हजार रुपये पेन्शन, शाळा, महाविद्यालयात शेतकर्‍यांचे मुलांना सवलत, शेतकर्‍यांचे मुलांना नोकरीत प्राधान्य, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील व्यक्तीस शासकीय नोकरी आदी मागण्यांसह विविध विषयावर चर्चा मार्गदर्शन करण्यात आले.
प्रास्ताविक बाळासाहेब दौडकर यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष पावले यांनी तर आभार वस्ताद दौडकर यांनी मानले. मेळाव्यास खेड तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.