Breaking News

‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप’ हा सर्वोत्तम पर्याय आहे - अरुण जेटली

पुणे, दि. 29 - ‘बदलत्या परिस्थितीनुसार संरक्षण क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी संरक्षण साहित्य आणि शस्त्रास्त्रांची निर्मिती देशामध्येच झाली पाहिजे. परदेशातील  ज्ञानावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वयंपूर्णतेवर भर देण्यात येत आहे. त्यासाठी संरक्षण क्षेत्रात ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप’ हा सर्वोत्तम पर्याय आहे,’ असे प्रतिपादन  संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी आज येथे केले.  खडकवासला येथील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीचा (डीआयएटी) पदवीप्रदान समारंभ अरुण  जेटली यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय सरंक्षण सचिव डॉ. एस. ख्रिस्तोफर, डीआयएटीचे कुलगुरु डॉ. सुरेंद्र पाल व विविध विद्याशाखाचे  प्रमुख उपस्थित होते. 
जेटली म्हणाले, गेल्या 70 वर्षांपासून आपल्याला शेजारी राष्ट्राची डोकेदुखी झाली आहे. राष्ट्रीय सुरक्षा हा देशासमोरील महत्त्वाचा प्रश्‍न असून, देशाला सीमांचे संरक्षण  करताना होणारी अंतर्गत घुसखोरी व दहशतवाद या दोनही पातळीवरच्या लढाय्यांना एकाच वेळी सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत संरक्षण क्षेत्रात  काळानुरूप आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे आवश्यक आहे. देशातील उत्तम शैक्षणिक संस्था, कुशल मनुष्यबळ आणि तंत्रज्ञानाचा वापर याद्वारे देशाला संरक्षण  उत्पादनाचे केंद्र बनवू शकतो, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
जेटली म्हणाले, संरक्षण आणि अर्थव्यवस्थेमध्ये वेगाने विकास होण्यासाठी तंत्रज्ञानाशी जोडले जाणे गरजेचे आहे. अर्थव्यवस्था शेतीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून  आहे. शेतीला आणि शेतकर्‍यांना तंत्रज्ञानाशी जोडणे हे अधिक आव्हान आहे. संरक्षण क्षेत्रामध्ये भारत आता बचावात्मक मार्गाने संरक्षण रणनिती आखत नाही. आपण  सदैव शस्त्रसज्ज असले पाहिजे. यादृष्टीने संरक्षण साहित्याची आपल्याच देशात निर्मिती करण्यासाठी अधिकाधिक खाजगी क्षेत्रानी पुढाकार घेण्याची गरज आहे.
डॉ. एस. ख्रिस्तोफर म्हणाले, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची ज्या गोष्टींशी सांगड घालता येईल त्याचा आधुनिक काळामध्ये वेगाने विकास होणार आहे. तंत्रज्ञानामुळे भारत  संरक्षण साहित्य निर्मितीसंदर्भात अधिक सक्षम आणि स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने वाटचाल करित आहे. डॉ. सुरेंद्र पाल यांनी डीआयएटीच्या शैक्षणिक कार्याचा वर्षभराचा  आढावा घेतला आणि प्रास्ताविक केले. यावेळी विद्यार्थ्यांना जेटली यांच्या यांच्या हस्ते पीएचडी, एमएस्सी व एमटेकच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.