ठाणेदार कोळी व पो.ना. नवले यांना लाच स्विकारतांना रंगेहात अटक
बुलडाणा, दि. 04 - येथील एका महाविद्यालयाच्या खुल्या क्रिडांगणावर आनंद मेला व स्वयंम रोजगार प्रदर्शनी आयोजीत करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र व जाहीरातीकरीता लाऊडस्पीकर परवानगी देण्याकरीता 1 लाख रुपये लाचेची मागणी करणार्या ठाणेदारास आज बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करीत अटक केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार योगेश सुरेशराव सावरकर वय 33 वर्ष व्यवस्थापक आनंद मेला व स्वयंम रोजगार प्रदर्शनी रा.आकोट जि.अकोला यांनी अॅन्टी करप्शन ब्युरो कार्यालय बुलडाणा येथे तक्रार दिली की, शहरातील श्री गोविंद विष्णु महाजन विद्यालय व महाविद्यालय मलकापूर चे खुल्या क्रिडांगणावर आनंद मेला व स्वयंम रोजगार प्रदर्शनी आयोजीत करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र व जाहीरातीकरीता लाऊडस्पीकर परवानगी देण्याकरीता दिपक रामकृष्ण कोळी, ठाणेदार मलकापूर शहर हे 1 लाख रुपयांची मागणी करीत आहे. या तक्रारीवरुन अॅन्टी करप्शन ब्युरो यांनी 1 मे 2017 रोजी आयोजीत केलेल्या पडताळणी कार्यवाही मध्ये आरोपी लोकसेवक रतीलाल शंकर नवले पोलीस नाईक, वय 45 यांनी तक्रारदार योगेश सावरकर यांना ठाणेदार दिपक कोळी यांचे वतीने 35 हजाराच्या लाचेची मागणी केली. तसेच पुन्हा 2 मे 2017 रोजी आयोजीत केलेल्या पडताळणी कार्यवाही मध्ये आरोपी लोकसेवक दिपक कोळी पोलीस निरीक्षक मलकापूर यांनी तक्रारदारास नवले यांनी सांगीतल्या प्रमाणे पंचासमक्ष लाचेची मागणी केली.
आज दिनांक 3 मे 2017 रोजी अॅन्टी करप्शन ब्युरो यांनी सापळा रचला असता कार्यवाही दरम्यान ठाणेदार दिपक रामकृष्ण कोळी याने पोलीस स्टेशन चे आवारातील पोलीस निरीक्षक यांचे कक्षात बसून लाचेची रक्कम पंचासमक्ष स्विकारली. यावरुन आरोपी दिपक रामकृष्ण कोळी व रतीलाल शंकर नवले यांचे विरुध्द कलम 7, 13(1)(ड) सह 13 (2) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा सन 1988 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदर कार्यवाही महेश चिमटे पोलीस अधिक्षक, विलास देशमुख अपर पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनाखाली विलास पाटील पोलीस उपअधिक्षक, पोनि एस.बी.भाईक, एएसआय शाम भांगे, पोहेकॉ रविंद्र लवंगे, पोना संजय शेळके, सुखदेव ठाकरे, पोकॉ संतोष यादव यांनी पार पाडली.

