Breaking News

मित्राचा खून करणार्‍यास जन्मठेपेची शिक्षा

सातारा, दि. 9 (प्रतिनिधी) : मित्राने उसने घेतलेले 1 हजार रुपये परत देत नसल्याच्या कारणातून चिडून जाऊन गंभीर मारहाण करून मारुती शिवाजी भंडलकर (वय 40, रा. तांबवे) खून केल्याप्रकरणी प्रवीण तुकाराम शिंदे (वय 36, रा. तांबवे, ता. फलटण) याला दुसरे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एम. मोहिते यांनी जन्मठेप व 10 हजार रुपये दंड, तो न दिल्यास 6 महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली. 
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 10 मार्च 2016 रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास प्रवीण शिंदे हा मारुती भंडलकर याच्या घरी उसने घेतलेले 1 हजार रुपये मागण्यासाठी गेला होता. त्यावेळी प्रवीण याने वाद घालून मारुती यांना फायटरने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. ही घटना रोहिणी मदने यांनी पाहिल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला. प्रवीण याने मारुती यांना दुचाकीवर घालून तेथून अपहरण केले. त्यादिवशी मारुती यांचा सर्वांनी शोध घेतला. मात्र, ते आढळून आले नाही. दुसर्‍या दिवशी सकाळी मारुती हे सालपे घाटात गंभीर जखमी अवस्थेत आढळले. बेशुध्द अवस्थेत त्यांना सातारा जिल्हा शासकीय रुग्णालय व पुढील अधिक उपचारासाठी पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. दि. 13 मार्च 2016 रोजी मारुती यांचा मृत्यू झाला. लोणंद पोलीस ठाण्याचे सपोनि संदीप भोसले यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा न्यायालयात सरकार व बचाव पक्षाच्यावतीने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड. नितीन मुके यांनी युक्तिवाद केला. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपीला शिक्षा ठोठावली. या खटल्यात एकूण 10 साक्षीदार तपासण्यात आले.