Breaking News

अजिंठा घाटातील अपघातानंतर बसमधील प्रवाशांची 6 तास कोंडी

जळगाव,, दि. 09 - जळगाव-औरंगाबाद मार्गावरील अजिंठा घाटात आज तीन अवजड वाहनांची धडक होऊन वाहतूक बंद झाली होती. याची कोणतीही माहिती जळगाव बस आगारात नव्हती. त्यामुळे पहाटे सहाच्या दरम्यान औरंगाबाद, पुणेकडे जाणार्‍या बस सुटल्या. साधारणपणे सात-सव्वासातच्या दरम्यान या बस फर्दापूरजवळ पोहचल्या तेव्हा तेथे वाहतूक खोळंबलेली होती. अपघातग्रस्त वाहने हटवून रस्ता मोकळा होईल अशी अपेक्षा बाळगून सर्वच बस रांगेत उभ्या होत्या. अखेर जळगाव-पुणे या बसमध्ये अडकलेल्या श्री. रमेश शिंदे (उमवि कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी) यांनी संपर्क केला. त्यांनी वाहतूक खोळंबल्याची माहिती दिली. एसटी कंट्रोलर, पोलीस कंट्रोलरुम व कलेक्टरसाहेब यांचेकडून काही मदत करता आली तर पाहा असे सांगितले. दरम्यान पोलीस कंट्रोलरुम व एसटी डी. सी. ऑफिस यांना प्रत्यक्ष बोलून माहिती दिली. श्री. शिंदे यांना कलेक्टरसाहेबांचा यांचा मोबाईल नंबर दिला.
बसमधील प्रवांशाचा आग्रह होती की, औरंगाबाद व पुणेसाठीच्या गाड्या सोयगावमार्गे जावू द्याव्यात. त्यावर बसमधील वाहक-चालक म्हणत होते, आम्हाला डी. सी. चे आदेश हवेत. ही बाब लक्षात घेवून डी. सी. ऑफिस मधील श्री. धायडे यांना प्रसंग समजावून सांगत तशी विनंती केली. ते म्हणाले, 15 मिनिटात सूचना करतो. त्यानंतर त्यांनी श्री. शिंदे यांच्या मोबाईलवरुन वाहक-चालकांशी त्यांचे बोलणे झाले आणि गाड्या सोयगाव मार्गे जावू द्या असे त्यांनी सांगितले. पण, बहुजन हिताय बहुन सुखाय या ब्रिदाला हरताळ फासत वाहक-चालक म्हणू लागले, आम्हाला लेखी आदेश पाहिजे. आमच्या तिकीट मशीनमध्ये रुट बदलावा लागेल.
दरम्यानच्या काळात श्री. शिंदे यांनी मोबाईलवरुन कलेक्टरसाहेब यांनाही माहिती दिली. सोयगाव मार्गे बस नेण्याचा विषय सांगितला. कलेक्टरसाहेबांनी त्वरित डी. सी. शी संपर्क करुन योग्य ती कार्यवाही करायला सांगितले. आता डी. सी. व कलेक्टरसाहेब यांच्या सूचना असूनही संबंधित वाहक-चालकांनी सोयगावमार्गे बस नेण्यास नकार दिला. जवळपास 30 ते 40 बस तेथे खोळंबल्या होत्या. 6 तासांपेक्षा जास्त वेळ अडकल्याने प्रवासी वैतागले होते. दुपारी 12.30 च्या दरम्यान घाटात एक मार्ग मोकळा झाला. तेव्हा औरंगाबादकडील गाड्या घाट उतरु लागल्या. जळगावकडून जाणार्‍या बस चालक-वाहकांनी आपल्या आडमुठेपणाने प्रवाशांच्या विरोधात वागण्याचा एक अध्याय लिहून टाकला. मोबाईल व इंटरनेटच्या जमान्यात लेखी आदेशाची वाट पाहणार्‍या एसटीच्या कर्मचार्‍यांनी आपल्या तत्परतेची काळी कुळकुळीत रेषा ओढून टाकली.