Breaking News

गारपीटीमुळे निफाड तालुक्यात 600 ते 700 हेक्टेर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

निफाड, दि. 04 - निफाड तालुक्यात 30 एप्रिल रोजी गारपिटीत चितेगाव, चेहेडी,नारायणगाव, वर्‍हेदारणा,चांदोरी,लालपाडी, ओने, दात्याने,सुकेणे, ओझर, धानोरे, बाणगंगा नगर, दिक्षी या 13 गावांमध्ये द्राक्ष,कांदा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुका कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक अहवालात या गावातील प्राथमिक अहवालानुसार 600 ते 700 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे. 
यामध्ये अंतिम टप्प्यात असलेले द्राक्ष बागांचे खुडे सुरु होते त्यावर परिणाम झाला. याशिवाय खडकमाळेगाव,वनसगाव,शिवडी, उगाव, लासलगाव,सोनेवाडी या भागातही अवकाळी पावसाने द्राक्ष व कांदा पिकांचे नुकसान झाले आहे. उगांव व परिसरात निवृत्ती क्षीरसागर यांचा तीन एकर तर दिलीप शिंदे यांचा एक एकर ,तर सोनेवाडी खुर्द येथील बाळासाहेब सानप यांचा चार एकर द्राक्षबाग वादळाने कोसळला आहे तीनही द्राक्षबागा परिपक्व होत्या. त्यांना आधारासाठीचे एंगलही वार्‍याने वाकविले आहे द्राक्षबागा कोसळल्याने द्राक्षघडांचे मोठे नुकसान झाले तर जमीनीवरही द्राक्षमण्यांचा सडा पडलेला होता. यामुळे द्राक्ष उत्पादकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे कोसळलेल्या द्राक्षबागा उभ्या करण्यासाठी द्राक्ष उत्पादकांना मजुरांची शोधाशोध करावी लागत होती
या बरोबरच सर्वात जास्त नुकसान कांदा या पिकांचे झाले कांदा काढणी सुरु असताना अचानक पाऊस सुरु झाल्याने काढलेला कांदा झाकताना शेतकर्‍यांना खूप कसरत करावी लागली यात काही प्रमाणात कांदा भिजला,काही ठिकाणी कांदा चाळीत पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले तसेच चितेगाव या भागात भाजीपाला पिकवणारे शेतकरी मोठया प्रमाणात आहे त्यांच्या पिकांचे गारा व मुसळधार पाऊस याने नुकसान झाला कोबी,फ्लॉवर,टोमॅटो आदी भाजीपाला पिकांचा यात समावेश आहे .