पादचार्याचे एटीएम कार्ड चोरून 43 हजाराचा गंडा
रत्नागिरी, दि. 09 - पादचा-याच्या खिशातील रोख रक्कम लांबविल्यानंतर एटीएम कार्डचा वापर करून सुमारे 43 हजाराला चोरट्याने गंडा घातला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 1 मे रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. विश्राम कृष्णा चिंदरकर (59, रा. विश्वेधाम को-ऑप. सोसायटी, बंदर रोड, रत्नागिरी) असे तक्रादाराचे नाव आहे. विश्राम हे विठ्ठल मंदिरासमोरील रस्त्यावर आंबे खरेदी करीत होते. अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातील साडेतीन हजार रुपये व एटीएम कार्ड चोरले. त्यानंतर चोरट्याने एटीएम कार्डचा वापर करून 40 हजार रुपये खात्यातून काढले. कार्डवरच पासवर्ड असल्याने त्या अज्ञाताचे चांगलेच फावल्याचे समजते. अज्ञाताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
