Breaking News

पारनेर बाजार समितीत कांद्याला अवघा 1 ते 5 रूपयांचा भाव, शेतकरी संतप्त

अहमदनगर, दि. 09 - नगर जिल्ह्यातील पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी शेतकर्यांनी तब्बल 18 हजार कांदा गोण्या विक्रीसाठी आणल्याने कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणावर कोसळले.रविवारी बाजार समितीत कांदा लिलावमध्ये कांद्याला 1 ते 5 रूपये प्रतिकिलो इतकाच भाव मिळाला.त्यामुळे शेतक-यांच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आले.दरम्यान भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाले असून राज्य सरकारने कांद्याला हमी भाव जाहीर करून कांद्याची निर्यात तातडीने सुरू करावी,अशी मागणी शेतक-यांकडून केली जात आहे.
पारनेर तालुक्यात शेतक-यांनी आपल्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा पिक घेतले आहे.गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.विशेषत: संगमनेर,अकोले,श्रीगोंदा या तालुक्यात अवकाळी पावसाने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे.आता सध्या शेतक-यांनी आपल्या शेतात तयार जालेला कांदा कापणी करून साठविला आहे.मात्र अवकाळी पावसाच्या भितीने ज्या शेतक-यांकडे कांदा साठवणुकीची काही व्यवस्था नाही,असे शेतकरी बाजार समिती मध्ये सध्या लिलावाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर आपला कांदा विक्रीसाठी घेऊन येत आहेत.कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे दर मात्र खूपच कोसळू लागले आहे.रविवारी पारनेर बाजार समितीत तब्बल 18 हजार कांदा गोण्या विक्रीसाठी आणण्यात आल्या होत्या.कांदा लिलावाच्या वेळी सुरूवातीला 5 रूपये असा भाव निघाला मात्र कमी प्रतीचा कांदा अवघ्या 1 रूपये प्रतिकिलो या दराने विकावा लागला.मोठ्या कष्टाने व मेहनतीने तयार केलेला कांदा मातीमोल भावाने विकावा लागल्याने शेतकर्याचा उत्पादन खर्च देखील निघणे मुश्कील झाले आहे.या पार्श्‍वभूमीवर सरकारने कांद्याला हमी भाव जाहीर करावा व तातडीने कांद्याची निर्यात सुरू करावी,अशी मागणी शेतकरी करीत आहेत.