Breaking News

सरकारला तीन वर्ष पूर्ण होणार असल्याने पंतप्रधान 2 कोटी नागरिकांना पाठवणार पत्र

नवी दिल्ली, दि. 11 - येत्या 26 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला तीन वर्ष पूर्ण होणार असून त्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मोदी तब्बल 2 कोटी नागरिकांना पत्र पाठवणार असून देशातील पाच मुख्य शहरांचा दौराही करणार आहेत. 
पंतप्रधान आपल्या दौ-याची सुरूवात गुवाहाटी पासून करणार आहेत. त्यानंतर ते बंगळुरू, पुणे, कोलकाता, जयपूर किंवा कोटा येथे जाणार आहेत. 26 मे ते 15 जून या कालावधीत तीन वर्ष पूर्ण होणार असल्याचा आनंद साजरा केला जाणार आहे. यासाठीच्या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्रीही सहभागी होणार आहेत. 27 ते 28 मे दरम्यान सर्व केंद्रीय मंत्री माध्यमांशी संवाद साधणार आहेत. याशिवाय सर्व मंत्रालय आपल्या उल्लेखनिय कामांची माहिती देणारी पुस्तिका प्रसिद्ध करणार आहेत.