Breaking News

नगर जिल्ह्यात होणार केवळ 25 हजार क्विंटल तुरीची खरेदी

अहमदनगर, दि. 05 - राज्य शासनाच्या आदेशानुसार अहमदनगर जिल्हा प्रशासनाने 22 एप्रिल पर्यंत नोंदणी झालेल्या तुरीचे सर्वेक्षण केल्यानंतर आता  फक्त 25 हजार 477 क्विंटल इतक्याच तुरीची खरेदी सुरू करण्यात आली आहे.सरकारच्या या निर्णयामुळे तूर उत्पादक शेतकर्यांमध्ये तीव्र नाराजी असून तुरीच्या  प्रश्‍नावरून जिल्ह्यात पुन्हा एकदा तीव्र आंदोलने होण्याची शक्यता आहे.
सरकारच्या निर्णयानुसार नाफेडने 22 एप्रिल रोजी सर्व तूर खरेदी केंद्रांवरील तूर खरेदी बंद केली.मात्र त्यानंतर स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 22 एप्रिल  पर्यंत नोदणी झालेली तूर खरेदी करण्याचे जाहीर केले.त्यानुसार जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील तूर खरेदीच्या 9 केंद्रांवर सर्वेक्षण केले.सर्वेक्षणाची जबाबदारी  तहसीलदार,जिल्हा उपनिबंधक व जिल्हा पणन अधिकारी यांच्यावर टाकण्यात आली होती.या पथकाने संयुक्तरित्या जिल्ह्यातील तूर खरेदी केंद्रावर सर्वेक्षण  केले.त्यानुसार नगर मधील केंद्रावर सर्वाधिक म्हणजे 9 हजार 06 क्विंटल तूर नोंदणी झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.त्याबरोबच पाथर्डी येथील केंद्रावर 2 हजार  884,नेवासा 2 हजार 600,शेवगाव 1 हजार 812 व कर्जत केंद्रावर 6 हजार 675 क्विंटल तुरीची नोंदणी झालेली आहे.जिल्ह्यातील पारनेर,राहुरी व श्रीरामपूर या  तीन केंद्रावर तुरीची कोणतीही नोंदणी झाली नसल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात तूर खरेदी केंद्रांवर एकूण 1 हजार 885 शेतकर्यांच्या 25  हजार 477 क्विंटल इतक्याच तुरीची नोंदणी झाली आहे.सरकारच्या आदेशानुसार आता फक्त नोंदणी झालेल्या या 25 हजार क्विंटल तुरीची खरेदी सुरू करण्यात  आली आहे.मात्र अद्यापही जिल्ह्यात हजारो क्विंटल तूर शेतकर्यांकडे शिल्लक आहे.गेल्या काही दिवसात अकोले,संगमनेर तालुक्यात वादळी वार्यासह जोरदार  पावसाने हजेरी लावली आहे.त्यामुळे पुन्हा अवकाळी पावसाच्या शक्यतेच्या पाश्वभूमीवर तूर उत्पादक शेतकरी चिंतातूर आहेत.एकूणच तुरीच्या प्रश्‍नावर राज्य  सरकारने घेतलेल्या भूमिकेविषयी जिल्ह्यातील शेतकर्यांमध्ये मोठी नाराजी दिसत आहे.