Breaking News

महापालिकेच्या 20 शाळेच्या 12 इमारतींमध्ये उभारले ’रेन वॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्प

पुणे, दि. 09 - पर्यावरण संवर्धन समितीने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 20 शाळेच्या 12 इमारतींमध्ये उभारलेल्या ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्पाचे नुकतेच लोकार्पण झाले. महापालिकेत झालेल्या लोकार्पण सोहळ्यावेळी अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, सह आयुक्त दिलीप गावडे, आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त मिनिनाथ दंडवते, कर्नल शशी दळवी, आरती हळबे, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे, अभियंता संघटनेचे अध्यक्ष अनिल मेंगशेटी, मनोज मराठे, शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी बी. एस. आवारी, वामन बाजारे, पर्यावरण संवर्धन समितीचे अध्यक्ष विकास पाटील, विनिता दाते, विश्‍वास जपे, पुरुषोत्तम पिंपळे, प्रभाकर मेरुकर, सुभाष चव्हाण, गोविंद चितोडकर उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धन समितीचे काम कौतुकास्पद आहे. त्यांनी महापालिकेकडून कोणतीही आर्थिक मदत न घेता पालिकेच्या शाळेत विविध प्रकल्प राबविले आहेत, असे सह आयुक्त दिलीप गावडे यावेळी म्हणाले. पाण्याची बचत होण्यासाठी पर्यावरण संवर्धन समितीने स्वत:च्या खर्चातून महापालिकेच्या शाळेत ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्प उभारले आहेत. पालिकेच्या 20 शाळेच्या 12 इमारतींमध्ये या प्रकल्पाची उभारणी केली आहे. यामुळे पावसाचे पाणी साचून त्याचा पुर्नवापर करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 12 लाख रुपये खर्च आला आहे. त्यापैकी 9 लाख रुपयाची मदत सीएसआरच्या माध्यमातून इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या उद्योग समूहाने केली आहे. यामध्ये महापालिका शाळेतील 4 हजार 800 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर मेरुकर यांनी केले. तर, विकास पाटील यांनी आभार मानले.