Breaking News

आकार फाऊंडेशनकडून सांगली जिल्ह्यातील 100 मुले शैक्षणिकदृष्ट्या दत्तक

सांगली, दि. 24 - आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित असणार्या सांगली जिल्ह्यातील 100 मुलांना आकार फाऊंडेशनच्या शैक्षणिक उपक्रमातंर्गत  दत्तक घेण्यात येणार असल्याची माहिती आकार फाऊंडेशनचे डॉ. प्रदीप पाटील, श्रीमती उज्ज्वला परांजपे व ज्योती आदाटे यांनी दिली. सहा ते 12 या वयोगटातील  ही मुले असून त्यांच्या उच्च माध्यमिकपर्यंतच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी आकार फाऊंडेशनच्यावतीने स्वीकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या शैक्षणिक दत्तक उपक्रमात गरिब घरातील गरजू मुला- मुलींना गणवेश, पुस्तके, वह्या, दप्तर, कंपास, एसटीचा पास व कपडे या गरजेच्या वस्तू दिल्या जाणार  आहेत. याशिवाय वैद्यकीय मदत, समुपदेशन व व्यवसाय निवड मार्गदर्शन या सेवाही मोफत पुरविल्या जाणार आहेत. व्यक्तिमत्त्व विकासासाठी निवासी शिबिरे,  शैक्षणिक सहली व लैंगिक शिक्षण हे उपक्रमही राबविले जाणार आहेत. प्रत्येक मुला- मुलीस दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरविण्यासह दर महिन्याला त्यांचे व त्यांच्या  कुटुंबियांचे समुपदेशन केले जाणार आहे.
या उपक्रमातंर्गत आपापल्या शाळेतील गरिब व गरजू विद्यार्थ्यांची यादी द्यावी, असे आवाहन सांगली शहरातील शाळांना करण्यात आले आहे. या आवाहनास प्रतिसाद  देऊन 30 मुलांची यादी आकार फाऊंडेशनला प्राप्त झाली आहे. या उपक्रमातंर्गत यावर्षी 100 मुलांना दत्तक घेण्याचे लक्ष्य आहे. या सर्व मुलांच्या घरी जाऊन सर्व्हे  केला जाणार आहे. खरोखरच ते गरिब आहेत का, याची चौकशी केली जाणार आहे. या उपक्रमात सहा ते 12 या वयोगटातील मुलांना दत्तक घेतले जाणार असून  त्यांच्या उच्च माध्यमिकपर्यंतच्या शिक्षणाची सर्व ती जबाबदारी घेतली जाणार असल्याचेही डॉ. प्रदीप पाटील यांनी सांगितले.