Breaking News

1 मे, महाराष्ट्र दिनी विविध पुरस्कारांचे वितरण

बुलडाणा, दि. 04 - 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याहस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. चिखली तालुक्यातील पेठ साजाचे तलाठी श्रीमती एस.पी सवडतकर यांना आदर्श तलाठी पुरस्कार देण्यात आला. यावेळी क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा युवा पुरस्कार (युवती) गटात कु. दिपाली कडू राऊत हिला प्रदान करण्यात आला, तर जिल्हा युवा (युवक) गटातील पुरस्कार नितेश एकनाथ थिगळे यांना वितरीत करण्यात आला. तसेच गुणवंत खेळाडू पुरस्कार कु. निकीता चंद्रकांत साळुंखे हिला, तर क्रीडा संघटक पुरस्कार विजय भाऊराव पळसकर व क्रीडा शिक्षक पुरस्कार जानकीराम घुबे यांना देण्यात आला. पोलीस दलातील उत्कृष्ट सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांना पोलीस महानिरीक्षक यांनी गौरविले आहे. त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. तयामध्ये बळीराम गिते तामगांव, प्रतापराव भुते धाड, अरूण कोटाफळे शेगांव, भास्कर वानखडे बुलडाणा, मोहम्मंद असलम शेख बुलडाणा, विलास कड पोलीस मुख्यालय बुलडाणा, अब्दुल मोमीन अब्दुल बशीर बुलडाणा यांचा समावेश आहे. नेहरू युवा केंद्राच्यावतीने पैनगंगा बहु. संस्था, नांद्रकोळी यांना उत्कृष्ट कार्याचा पुरस्कार देण्यात आला. मनरेगातंर्गत विविध वैयक्तिक कामांचे कार्यारंभ आदेश याप्रसंगी वितरीत करण्यात आले.