Breaking News

महानगरातील नागरी असुविधा रोखण्यासाठी ग्रामीण व छोट्या शहरांचा विकास आवश्यक - डॉ.सुकेश झंवर

बुलडाणा, दि. 05 - देशातील महानगरांना आलेले बकालपण, गलिच्छपणा यामुळे सर्वसामान्यांची कठीण बनलेली जिवनशैली लक्षात येवून महानगरांमधील नागरी असुविधा रोखण्यासाठी ग्रामीण व छोट्या शहरांच्या विकासावर अधिक भर देण्याची आवश्यकता असल्याचेप्रतिपादन बुलडाणा अर्बनचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.सुकेश झंवर यांनी केले. मुंबई येथील इकोनॉमिक टाईम्स या दैनिकाच्या वतीने आयोजीत करण्यता आलेल्या ‘लँड’ समिट 2017 या आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, फ्रेनीमॅक व फ्रेनी डी कंपनीचे व्हाइस प्रेसिडेंट व चिफ सेक्रेटरी उपस्थित होते.
भारतामध्ये जागेच्या व घरांच्या किंमती वाढत आहे. परंतू त्या तुलनेत नागरीकांना काहीच नागरी सुविधा मिळत नाहीत. भरमसाठी कर भरुन सुध्दा किमान सुविधा मिळत नाही यावर चर्चा व्हावी हा या ‘लँड’ समिटचा मुख्य उद्देश होता. या परिषदेत बोलतांना डॉ.झंवर म्हणाले की, आज महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरी अव्यवस्था निर्माण झाली आहे. अनेक शहरांना बकालपण आले आहे. यामुळे नागरीकांची जिवनशैली कठिण अवस्थेमध्ये गेली आहे. हे सर्व रोखण्याची नितांत आवश्यकता असून यासाठी ग्रामीण व छोट्या शहरांचा देखील विकास होणे गरजेचे आहे. या परिषदेत डॉ.झंवर यांनी बुलडाणा अर्बनच्या माध्यमातुन केलेल्या वेगवेगळ्या विकास कामांची माहिती दिली. शहर सौंदर्यीकरणाची माहिती दिली. अत्यंत कमी पैशाच, कमी खर्चात कशाप्रकारे बुलडाणा अर्बन नागरी सुविधा उपलब्ध करुन देत आहे याबाबत माहिती दिली. बुलडाणा अर्बनच्या सर्व सामाजी उपक्रमांचा उल्लेख करुन व त्यातुन छोट्या माणसांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत या उपक्रमांचा कसा फायदा झाला याचे विवेचन डॉ.झंवर यांनी या समीटमध्ये केले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महानगरांमध्ये उद्भवलेल्या नागरी असुविधांचा मुद्दा घेवून सरकार आपल्या परीने नागरी सुविधांमध्ये कशा पध्दतीने सुधारणा करण्यात येईल याचा प्रयत्न करेल असे स्पष्ट केले. तर यावेळी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांचे समवेत उपस्थित असलेले हायपर लुप कंपनीचे बिबॉप गस्टीलो यांनी आवाजापेक्षा जास्त गतीने धावणार्‍या रेल्वेची संकल्पना मांडली.
बँकींग क्षेत्रातुन या आंतरराष्ट्रीय लँडसमिट 2017 साठी बुलडाणा अर्बनला आमंत्रीत करुन बहुमान मिळवून दिल्याबद्दल डॉ.सुकेश झंवर यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी, अध्यक्षा सौ.कोमलताई झंवर, संस्थेचे संचालक मंडळ तसेच सभासद, ग्राहकांनी अभिनंदन केले आहे.