Breaking News

पक्षकाराने एक पाऊल पाठीमागे घेतल्यास वाद मिटवून संवाद साधला जाईल

। प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी यांचे प्रतिपादन 

अहमदनगर, दि. 09 - लोकन्यायालय ही सामाजिक चळवळ आहे. या चळवळीला देशभर व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. या चळवळीतून समाजातील शेवटच्या घटकातील व्यक्तीला जलद गतीने न्याय मिळत आहे. या लोकन्यायालयाला सर्वांनी सहकार्य करावे. पक्षकाराने एक पाऊल पाठीमागे घेतल्यास वाद मिटवून संवाद साधला जाईल. या नवीन इमारतीत हे पहिले लोकन्यायालय आयोजित करण्यात आले आहे, असे प्रतिपादन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी यांनी केले.
जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयाचे उद्घाटन न्या. कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश एस. के. केवले, सचिव एम. एच. शेख, अ‍ॅड. ए. एस. पिंगळे, मधुकर कोळपकर, सरकारी वकील अनिल सरोदे, न्या. एस. व्ही. माने, न्या. आर. व्ही. ताम्हणेकर, एस. जी. इनामदार, ए. डी. देव, आर. एम. पांडे, एच. एम. देशपांडे, बी. एन. चिकणे, एस. एस. देशपांडे, आर.  व्ही. मोहिते, के. के. शहा, एस. एस. जगताप, पी. एम. निर्‍हाळे, एस. पी. नलगे-केसतीकर, पी. पी. भारसाकडे-वाघ, टी. एम. देशमुख, ए. ए. नागोरी, अ‍ॅड. आर. के. गवळी, ए. एम. घोडके, पी. के. कापसे, केदार, केसकर, मंगेश दिवाणे, सिद्धार्थ सोळंकी, इम्रान शेख, अमित महांडुळे, मोहन कुलकर्णी, बाबासाहेब भालेराव, अनिल ढगे,  चौधरी आदींसह उपस्थित न्यायाधीश, वकील व पक्षकार उपस्थित होते.
सचिव एम. एच. शेख म्हणाले की, मागील लोकन्यायालयात 35 हजार 659 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील 1828 प्रकरणे मिटली असून, 25 कोटी 92 लाख 50 हजार 262 रुपयांची प्रकरणे तडजोडीने मिटली. आजच्या लोकअदालतमध्ये 20080 प्रकरणे ठेवण्यात आली असून, दाखलपूर्व 13370 व दाखल प्रकरणे 6710 आहेत. ही प्रकरणे निकाली काढण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. लोकन्यायालयास मदत करावी, असे ते म्हणाले. या कामासाठी सरकारी वकील, विधी स्वयंसेवक, वकील बंधू यांनी सहकार्य केले. या लोकन्यायालयात मोटार अपघात प्रकरणे, स्पेशल केसेस, क्रिमिनल अपिले, विशेष दिवाणी दावे, विशेष दरखास्ती, हिंदू मॅरेज पिटीशन, लवाद दरखास्ती, नियमित फौजदारी प्रकरणे, संक्षिप्त फौजदारी प्रकरणे, खटलापूर्व प्रकरणे होती. सूत्रसंचालन न्या. पी. पी. केसतीकर यांनी केले. आभार न्या. एस. एस. जगताप यांनी मानले.