Breaking News

सामाजिक चळवळीचा बळी देणारे आधूनिक वामनरूपी दलाल

दि. 25, एप्रिल  - दगडधोंड्यांचा ,गड किल्यांचा साधु  संतांचा हा महाराष्ट्र...छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या स्वराज्याला पुरोगामी विचारांची भक्कम तटबंदी बांधणारे म. फुले, राजश्री शाहु महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांचा हा महाराष्ट्र... बारा बलुतेदार आठरा पगड बहुजनांचा हा महाराष्ट्र तोडण्याची सुपारी घेणारे दलाल सर्वच समाजाच्या बीळात दडले आहेत.कोण आहेत हे दलाल? काय कुट शिजवले त्यांनी? बहुजनांच्या ऐक्याला जातीय मतभेदांचा सुरूंग लावणारे सुपारीखोर कोण? त्यांच्या नाकात वेसण कोण घालणार? य सर्व प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न... लवकरच अ‍ॅड.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर,पुरूषोत्तम खेडेकर, म. ना. कांबळे यांच्या सारख्या समाज अभ्यासकांची मॅरेथान मुलाखत...
समाजाला दिशा देऊन समाजाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी समाज नेत्यांवर असते.समाजात रूढ असलेल्या प्राचीन चाली रिती या विकासासमोर प्रतिरोधक ठरत असतील तर त्यांना अलगद बाजूला सारण्याची मानसिकता समाजात तयार करीत असतानाच मुळ संस्कृतीला धक्का लागणार नाही याची काळजी समाज नेत्यांना घ्यायची असते.
एका बाजुला सामाजिक संस्कृती जपत समाजाला आधुनिक वाटचालीस प्रवृत्त करण्याबरोबर विकासाचे दानही पदरात टाकण्याची जबाबदारी समाज नेत्यांवर असते.सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विकास साधत असतांना शहर आणि गावा असा समन्वय साधून समाजात विविध जात धर्म पंथांमधील एकोपा कायम ठेवण्याची जबाबदारीही समाज नेत्यांवर असते. या कसोटीवर उतरणारे समाज नेते खर्या अर्थाने समाज पुरूष म्हणविले जातात.
विद्यमान समाज चळवळीत स्वयंघोषित समाज पुरूषांचे उदंड पिक आले आहे.अवघी समाज चळवळ या मंडळींनी हायजक केल्यने राजकारणाच्या दावणीला बांधली गेली आहे.सामाजिक चळवळ राजकारणाच्या दावणीला समाज चळवळ बांधून हे कथित समाज पुरूष सत्तेच्या गव्हाणीत उष्टा पडलेला चारा चघळून रवंथ करतांना दिसत आहेत. फुले शाहू आंबेडकरांची महान परंपरा असलेली ही चळवळ या दलालांनी लिलावात काढल्याने सामाजिक विषमता बोकाळू लागली आहे.ही विषमता समाजात वावरणार्या विविध जाती धर्म पंथांमध्ये असलेल्या सलोख्याच्या मुळावर उठू पहात आहे.गावागावात शहराशहरांमध्ये काल परवा पर्यंत सुखदुःखात धावून येणारे एकमेकांच्या जीव घेण्यास उत्सुक झाले आहेता. त्याचे मुळ बाजारबुणग्यांच्या दलालखोरीत आहे.
बळी आणि वामनाची कथा सर्वश्रूत आहे. हे दलाल याच कथापाञातील वामनाची भुमिका साकारून सामाजिक चळवळीला बळी बनवू पहात आहेत.वामनाच्या आधूनिक रूपात वावरणार्या या दलालांना चव्हाट्यावर आणून नागडे करण्याची जबाबदारी पुन्हा एकदा समाजालाच पार पाडावी लागणार आहे.समाजाला ही जबाबदारी समजून घ्यावी लागणार आहे.ते काम चळवळीचा खर्या अर्थाने वारसा जपणार्या काही मोजक्या मंडळींना पार पाडावे लागणार आहे.आणि म्हणूनच लोकमंथनच्या व्यासपीठ या कर्तव्याची आठवण करून देण्यासाढठी अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर, पुरूषोत्तम खेडेकर, म.ना.कांबळे यांच्या सारखै निवडक विचारवंत आपल्या भेटीसाठी येणार आहेत.