Breaking News

निघोजमध्ये मळगंगा देवीच्या मानाच्या काठीची मिरवणूक

अहमदनगर, दि. 17 - महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले निघोज येथील मळगंगा देवीच्या यात्रोत्सवास नुकतीच सुरुवात झाली आहे. सोमवारी हळद लावण्यानंतर दुसर्‍यां दिवशी मंगळवारी देवीच्या मानाच्या काठीची मिरवणूक असंख्य भाविकांच्या उपस्थितीत काढण्यात आली होती. मिरवणुकीत  85  फुटांपेक्षा  उंच व पाचशे किलोपेक्षा जास्त वजनाची देवीची काठी असते. मळगंगा देवी सर्वात मोठी बहीण असल्याने अहमदनगर व पुणो जिल्ह्यात असणार्‍या सात बहिणींच्या मानाच्या काठया निघोजला वाजत गाजत येतात. ही मानाची काठीची मिरवणूक काढण्यासाठी हजारो भक्त सज्ज असतात.
निघोजची आई मळगंगा नवसाला पावणारी असल्याची ख्याती आहे. त्यामुळे देशभरात देवीच्या नावाचा गाजावाजा आहे. या यात्रेला देशभरातून 10 ते 12 लाख भाविक दरवर्षी येत असतात. त्यादृष्टीने नियोजन करण्यात येते. या यात्रोत्सवावार पाणीटंचाईचे सावट असून, पाण्याचे नियोजनाचे आव्हान आहे. मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट,निघोज ग्रुप ग्रामपंचायत, निघोज ग्रामस्थ, मुंबईकर मंडळी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, निघोज विविध कार्यकारी सेवा सोसायटी, सर्व पतसंस्था व सामाजिक संघटना यांनी एकत्र येत शासनाने ठोस निर्णय घेण्याची मागणी केली आहे.