Breaking News

शॉर्टसर्किटमुळे दहा शेळ्यांचा होरपळून मृत्यू

अहमदनगर, दि. 17 - पारनेर  तालुक्यातील  वारणवाडी येथील (पारदरा) येथे वीजवाहक तारा घासल्याने अपघात घडला असुन यामध्ये 10 शेळ्यांचा या अपघातात होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेत शेतकरी शंकर खेमू दुधवडे यांचे 1 लाख, 25 हज़ारांचे नुकसान झाल्याचा  पंचनामा कामगार तलाठी भाऊसाहेब लांडे यांनी केला आहे.
 या घटनेची माहिती प्राप्त होताच जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ  दाते  यांनी  तहसीलदार सौ. भारती सागरे यांना माहिती देऊन पंचनामा करण्याची मागणी केली. तसेच महावितरणचे तालुका अभियंता प्रजापती व देवरे यांनाही माहिती देऊन वीजपुरवठयात सुधारणा करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली. याबाबतची माहिती अशी की, वारणवाडी (पारदरा) येथील गट नंबर 277-278 मध्ये आदिवासी शेतकरी शंकर दुधवडे राहतात. शनिवारी सकाळी 11.30 च्या सुमारास वीजपुरवठा सुरू असताना वीजवाहक तारा एकमेकांना घासल्याने आगीचा लोळ शेळ्यांच्या गोठ्यावर पडला. यामुळे गोठयाला आग लागून 10 शेळ्यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. तर 3 शेळ्या जखमी झाल्या. यामुळे आदिवासी शेतकर्याचा रोजगार बंद झाला असून, त्यास तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी काशिनाथ दाते यांनी केली आहे. पारदरात परिसरात अनेक वीजवाहक तारा लोंबकळताना दिसून येत आहेत. यामुळे आग लागण्याच्या घटना घडत आहेत. महावितरण कंपनीने अशा घटना घडू नये म्हणून दक्षता घेण्याची मागणी माजी काशिनाथ दाते यांनी केली आहे.