Breaking News

मारहाणप्रकरणी तिघांना सक्तमजुरी

वडूज, दि. 15 (प्रतिनिधी) : जमिनीवरून वादातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून सख्ख्या भावास व इतर नातेवाइकांस लोखंडी गज, कळकाच्या काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी बंडू उध्दव तुपे (रा. दातेवाडी, ता. खटाव), सुधाकर बजरंग कदम व सचिन सुधाकर कदम (रा. कदमवाडी, ता. खटाव) यांना वडूजचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. बी. कुडते यांनी दोषी धरून एक वर्ष सक्तमजुरी व 6 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. 
बंडू उध्दव तुपे यांचे त्यांचा भाऊ बाबुराव उध्दव तुपे यांचा वडिलोपार्जित जमिनीवरून वारंवार वाद होत होता. दि. 8 नोव्हेंबर 2011 रोजी बाबुराव उध्दव तुपे यांच्या घरातील सर्वजण घरात झोपले असताना त्यांचा भाऊ बंडू तुपे व सुधाकर कदम व सचिन कदम यांनी बाबुराव तुपे व इतर सदस्यांना मारहाण केली होती. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक डी. ए. शेलार यांनी करून न्यायालयात दोषरोपपत्र दाखल केले होते. या खटल्यास सरकारी पक्षातर्फे सह. सहकारी वकील रमेश साळुंखे यांनी सात साक्षीदार तपासले. न्यायदंडाधिकारी एम. बी. कुडते यांनी सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपींना एक वर्ष सक्त मजूरी व 6 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.