Breaking News

जावळी तालुक्यात दोन लाखांची दारू जप्त

मेढा, दि. 15 (प्रतिनिधी) : जावली तालुक्यातील पाचवड-कुडाळ रोडवर म्हसवे फाटा येथे दारूची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती मेढ्याचे सपोनि देवीदास कठाळे यांना मिळाली होती. त्यांनी तात्काळ सापळा रचून 2 लाखांची दारू जप्त केली. याप्रकरणी विकास नारायण जाधव (रा. शेते, ता. जावली) यास पोलिसांनी अटक केली.
म्हसवे फाटा येथे गुरुवारी दारूची चोरटी वाहतूक होणार असल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी आर. आर. पाटील व वाई उपविभाग यांनी या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश मेढ्याचे सपोनि देवीदास कठाळे यांना दिले. त्याप्रमाणे कठाळे यांनी मेढा पोलीस ठाण्याची टीम घेऊन सापळा रचला. यामध्ये विकास नारायण जाधव, (वय 42, रा. शेते, ता. जावली, जि. सातारा) यास त्याची टाटा इंडिका वाहन (एमएच 11 4128) मधून विक्री करण्याकरिता देशी दारुचे दोन बॉक्स घेऊन जात होता. त्याच्या गाडीवर  यूथ, जिल्हा उपाध्यक्ष असे लिहिले होते. पोलिसांनी सापळा रचून त्याला वाहनासह ताब्यात घेतले.  पोलिसांनी 2 लाख 2 हजार 400 रुपयाचा दारुचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्यावर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी तालुक्यात कोठेही अवैध दारू विक्री करताना निदर्शनास आले तर नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.