Breaking News

अंधश्रद्धा-कर्मकांडात अडकू नका ः ह.भ.प. मेटे महाराज यांचे आवाहन

अहमदनगर, दि. 17 - माणूस संसाररूपी भवसागरात अडकला आहे. कर्मकांडाच्या, अंधश्रध्देच्या भूलथापांना बळी पडत चालला आहे. पाप-पुण्याच्या थोतांडी गोष्टींमुळे त्यास भगवंताच्या नामस्मरणाचाही विसर पडला आहे. मात्र, जगाच्या कल्याणाकरिता प्रत्येकाने विठ्ठलाचे मनोभावे नामस्मरण केल्याशिवाय तरणोपाय नाही, असे प्रतिपादन परिवर्तनवादी युवा विचारवंत ह.भ.प. सिध्दीनाथ मेटे महाराज यांनी केले.
शिंगवे (अ.नगर) येथील हनुमान जयंतीनिमित्त आयोजित सप्ताहानिमित्त ते बोलत होते. कीर्तन सेवेचे प्रथम पुष्प गुंफताना मेटे महाराज यांनी विठ्ठलनामाचे महत्व विशद केले. काही लोक पाप-पुण्याचा बागूलबुवा उभा करीत आहेत.त्यांच्याकडे माणसाने लक्ष देऊ नये. विठ्ठलभक्तीतच सर्व जीवनाचे सार आहे. हे तुकारामापासून सर्व संतांनी सांगितले आहे. मात्र,त्याकडे आपण दुर्लक्ष करीत आहोत. त्यामुळेच नको त्या गोष्टींच्या नादाला लागलो आहोत.
पाप क्षालनाकरिता कोणत्याही दांभिक कार्याच्या मागे न लागता विठ्ठल नामस्मरणातून मानवात वैचारिक परिवर्तन दिसून येते. यातूनच माणसाच्या प्रगतीचा मार्ग सुकर होतो. या शिवाय आपल्या कार्याचा समाजाला फायदाही होतो. तसेच या कार्याचा भगवंतालाही हेवा वाटतो. या प्रसंगी ह.भ.प. पुंड महाराज, संजय जाधव महाराज, शिंदे महाराज, दत्तात्रय खांदवे महाराज, सागर शेळके. आदी उपस्थित होते. सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी बजरंग तरुण मंडळ परिश्रम घेत आहेत.