Breaking News

केंद्राकडून कॉलेज रँकिंग जाहीर, महाराष्ट्रातील कोणतं कॉलेज टॉप?

नवी दिल्ली, दि. 04 - देशातल्या शिक्षण संस्थांचं त्यांच्या गुणवत्तेच्या आधारे रँकिंग आज केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं जाहीर केलंय. खरंतर महाविद्यालयं, शिक्षणसंस्थांची गुणवत्ता तपासण्याचं काम नॅक, एनबीए यासारख्या संस्था याआधी करत होत्या. पण यात अधिक पारदर्शकता यावी यासाठी मोदी सरकारनं मागच्या वर्षीपासून इंडिया रँकिंग या नावानं अशा पद्धतीनं शैक्षणिक संस्थांचं रॅकिंग सुरु केलंय. विद्यापीठं, इंजिनियरिंग, मॅनेजमेंट, फार्मसी यासारख्या विविध वर्गात ही रॅकिंग जाहीर करण्यात आलीय. सगळ्यात विशेष म्हणजे यावर्षी या रँकिंगमध्ये पहिल्यांदाच सर्वसाधारण महाविद्यालयांचा समावेश करण्यात आलेला होता.
देशातल्या शंभर टॉप कॉलेजेसची यादी केंद्र सरकारनं जाहीर केलीय. विद्यापीठांच्या यादीत पुणे विद्यापीठ दहाव्या क्रमाकांवर, इंजिनियरिंगमध्ये आयआयटी बॉम्बे, शिवाय टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई या महाराष्ट्रातल्या काही संस्थानी आपला नावलौकिक ठेवला असला, तरी सर्वसाधारण महाविद्यालयांच्या कामगिरीत मात्र महाराष्ट्र मागे पडलेला आहे. ज्या पुण्याला आपण मराठी लोक विद्येचं माहेरघर म्हणतो, त्या पुण्यातली कॉलेजेसही या यादीत फारसी छाप पाडू शकलेली नाहीयेत. या कॉलेजेसच्या या यादीत महाराष्ट्रातलं पहिलं नाव हे 30 व्या क्रमांकावर सापडतं.
पुण्यातल्या राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी या महाविद्यालयानं हा क्रमांक पटकावलाय. तर 35 व्या क्रमाकांवर पुण्यातलं फर्ग्युसन कॉलेज आहे. त्यानंतर पाठोपाठ 36 वा क्रमांक आहे अमरावतीच्या डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशननं. तर मुंबईत ज्या कॉलेजचं नाव एरवी सगळ्यांच्या तोंडावर असतं ते झेवियर्स कॉलेज 40 स्थानावर आहे.