Breaking News

रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्यास मोदी सरकारचा विरोध

नवी दिल्ली, दि. 21 -  पेट्रोल पंप डिलर्सच्या संघटनेने महाराष्ट्रासह आठ राज्यातील पेट्रोल पंप दर रविवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र तेल मंत्रालयाने या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. यामुळे सर्वसामान्य वाहनचालकांना त्रासाला सामोरं जावं लागेल, असं मोदी सरकारने म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून आठवड्यातून एकदा इंधन न वापरुन बचत करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र इंधनबचत ही वाहनचालकांनी स्वयंस्फूर्तीने करावी, पेट्रोल पंप बंद ठेवणे, हा त्यावरील उपाय नसल्याचं मोदी सरकारने ठणकावून सांगितलं.
या आठ राज्यांमध्ये महाराष्ट्रातील प्रामुख्याने मुंबईसह दक्षिणेकडील तामिळनाडू, केरळ, कर्नाटक (मुख्यत्वे बंगळुरु भागातील), आंध्र प्रदेश, तेलंगणा, पुदुच्चेरी आणि हरियाणा या राज्यांचा समावेश आहे. 14 मेपासून येणार्‍या दर रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ऑल इंडिया पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनने आपण या उपक्रमात सहभागी होणार नसल्याचं आधीच स्पष्ट केलं होतं. पब्लिक सेक्टरमधील 53 हजार 224 पेट्रोल पंपांपैकी 80 टक्के ‘ऑल इंडिया पेट्रोलियम डिलर्स असोसिएशन’मध्ये येतात.