Breaking News

गणेशोत्सव मंडळांनी समाजोपयोगी कामे करावी : ना. शिवतारे

सातारा, दि. 15 (प्रतिनिधी) : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रबोधनात्मक देखावे सादर करुन समाजोपयोगी कामे करावीत, असे आवाहन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केले.
येथील नियोजन भवनात सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सार्वजनिक गणेशोत्सव अभियानांतर्गत सजावट स्पर्धेचे पारितोषिक वितरण पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव, सांस्कृतीक कार्य विभागाच्या सहायक संचालक अमीता तळेकर उपस्थित होत्या.
गणेशोत्सव सण हा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा करतात, असे सांगून शिवतारे म्हणाले, गणेशोत्सव कालावधीत बेटी बचाव, व्यसन मुक्ती व पाणी बचतीचे महत्व सांगितले पाहिजे. आपली तरुण पिढी देशाची ताकद आहे. ही तरुण पिढी व्यसनापासून दूर राहिली पाहिजे.  गावांगावांमध्ये गणेशोत्सव मंडळांची संख्या वाढत आहे. म्हणून शासनाने एक गाव एक गणपती योजना आणली आहे. गणेश मंडळाचे कार्यकर्ते तरुण असतात ही तरुण मंडळी सर्व समाजातील लहानांपासून थोरापर्यंत सगळ्यांना एकत्र घेवून गणेशोत्सव साजरा करतात. यामुळे नेतृत्व गुण विकसित होऊन लहान वयापासूनच समाजाचे हित जोपासण्याची सवय निर्माण होते. गणेशोत्सवाच्या कालावधीत सर्वस्तरातील लोकांचा समावेश असतो. यामुळे सर्वांच्या विचारांची देवाण-घेवाण होवून चांगला समाज घडविण्यास मदत होते. पुढील गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक गणेश मंडळांनी समाज प्रबोधनात्मक देखाव्यांबरोबर खास करुन ग्रामीण भागातील गणेश मंडळांनी जलसंधारणाची कामे हाती घ्यावीत, असे आवाहन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केले. या कार्यक्रमास सार्वजनिक गणेश मंडळांचे कार्यकर्ते, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.